मुंबई : करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण (मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आदी), पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरमधील सर्व दुकाने, खासगी कार्यालये, आस्थापने, कारखाने ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने शुक्रवारी घेतला. या बंदमधून दूधविक्री केंद्रे, जीवनावश्यक वस्तुविक्री दुकाने, किराणा दुकाने, बँका, औषधांची दुकाने वगळण्यात आली आहेत.
याचप्रमाणे राज्य सरकारनं अनेक शहरांमध्ये अत्यावश्यक सेवा सोडून लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, आरोग्यमंत्री आज शरद पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. शरद पवार हे देखील राज्यातील परिस्थितीचा आढावा घेत असल्याची माहिती समोर आली आहे.
शरद पवारांची भेट घेतल्यानंतर एका मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना टोपे म्हणाले,’शरद पवारांनी तातडीने केंद्र सरकार आणि आरोग्य मंत्र्यांशी फोनवरुन चर्चा केली. शरद पवारांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी 20 मिनिटे चर्चा केली. राज्य सरकार मेडिकल कॉलेजना सर्व उपकरणे देण्यास तयार आहे. पण मेडिकल कॉलेजसना कोरोना टेस्टिंग किट केंद्राने उपलब्ध करुन द्यावी, ही आमची केंद्राकडे मागणी आहे, असं टोपेंनी सांगितलं.
पुढे बोलताना टोपे म्हणाले की, ‘शरद पवारांशी सविस्तर चर्चा केली, सध्याची परिस्थिती सांगितली. केंद्राने आपल्याला चाचण्यांची परवानगी द्यावी, मेडिकल कॉलेजमध्ये टेस्टिंग लॅब आम्हाला करायच्या आहेत, केवळ किट्स केंद्राने उपलब्ध करुन द्यावे, असं राजेश टोपे म्हणाले.
दरम्यान, ‘आपण सर्वांनी व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. लॅब वाढवण्याची गरज आहे. त्याबाबत शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलणार आहेत. तसेच ज्या जीवनावश्यक सेवा आहेत, मेडिकल, फार्मसी, बँकिंग, याव्यतिरिक्त लोकांनी प्रवास टाळावा, असं आवाहन टोपेंनी केलं.


