मुंबई : रुग्णांची चाचणी करण्याकरता अधिक चाचणी केंद्रे उपलब्ध व्हावेत, या दृष्टीने वैद्यकीय शिक्षण विभागाने डिपार्टमेंट ऑफ हेल्थ रिसर्च अँड इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडे आणखी केंद्रांना नव्याने मान्यता देण्याची विनंती केली होती.
तसेच यानुसार मुंबईतील परळ येथील हाफकिन इन्स्टिट्यूट आणि पुण्यातील बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून जनरल हॉस्पिटल यांना करोना चाचणी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
‘राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि खासगी केंद्रांच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत कोरोना तपासण्यांची क्षमता शंभराहून बावीसशेपर्यंत वाढविण्यात येत आहे,’ अशी माहिती वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली. मुंबई येथे माध्यमांशी बोलताना दिली.
दरम्यान, ‘मुंबईतील भायखळा येथील जे.जे.महाविद्यालय रुग्णालयात अशा प्रकारचे चाचणी केंद्र उभारण्यात आले असून यालाही उद्याच मान्यता मिळणार आहे. यामुळे या तीनही तपासणी केंद्रातून दररोज सहाशे नमुन्यांची तपासणी करणे शक्य होणार आहे. सध्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत नागपूर येथे इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अशा चाचणीसाठी केवळ एकच केंद्र उपलब्ध आहे,’ अशी माहिती देशमुखांनी दिली.
याचप्रमाणे लवकरच नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, त्याचप्रमाणे अकोला, धुळे, औरंगाबाद, सोलापूर, मिरज आणि लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेमध्येही तपासणी केंद्रे सुरू होणार आहेत. यापैकी नागपूर येथील तपासणी केंद्राची क्षमता दोनशे तर अन्य केंद्रांची क्षमता प्रत्येकी शंभर आहे.


