उस्मानाबाद : घरातील कर्ता माणूस कोरोनाने हिरावून गेल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील १ हजार १४ स्त्रिया विधवा झाल्या आहेच. त्यांचे संसार उघड्यावर पडले असुन, कोरोनाच्या कहरामुळे आर्थिक, मानसिक झळ सर्वांनाच बसली असून, हे सत्र अद्यापही कायम असल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. कोरोनाने चालती, फिरती, बोलती माणसे हिरावून नेली आहे. यातच आयुष्याचा जोडीदार गमावल्याने महिलांचे दुःख सांगून समजत नाही तर वाटूनही घेता येत नाही, असे आहे. कोरोनाने साथ गमावल्याची संख्या वाढतच आहे.
त्यामुळे कोरोनामुळे विधवा झालेल्या जिल्ह्यातील एक हजार १४ महिलांना शासनाच्या विविध सवलतींचा महिनाभरात लाभ द्या, असे निर्देश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले. कोरोनामुळे घरातील कर्ता पुरुष गमावल्याने त्या कुटुंबीयांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा कुटुंबीयांचे दैनंदिन जीवनक्रम सुरळीत चालू ठेवण्यासाठी अनेक आव्हाने निर्माण होत आहेत.
राज्यातील महिला व बाल विकास विभागाच्या धोरणाप्रमाणे टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. या कुटुंबीयांना त्यांच्या गरजेनेनुसार आणि पात्रतेनुसार शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडील शासन निर्णयाप्रमाणे (२० ऑगस्ट २०१९) विविध योजनांचा लाभ द्यावयाचा आहे.
विधवा झालेल्या महिलांच्या कुटुंबीयांपर्यंत योजना पोचविण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बी. एच. निपाणीकर यांनी अंगणवाडी सेविकांमार्फत गावनिहाय सर्वे केला. त्यांची तालुकानिहाय आणि वयोगटानिहाय यादी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात आली आहे. या महिलांना महिनाभरात शासनाच्या विविध सवलतींचा लाभ द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
त्या विधवा महिलांचे काय?
विधवा महिलांच्या पुढच्या आयुष्याचे काय याचे उत्तर शासकीय यंत्रणेकडे नाही. सध्या तरी राज्य शासनाने आई- वडिलांचे छत्र हरविल्या मुलांसाठी बालसंगोपन योजना पाच लाखापर्यंत जाहीर केली आहे. मात्र, कोरोनाने पतीचे निधन झालेल्या विधवा महिलासाठी महिला व बालकल्याण विभागाने अद्याप कोणतीही ठोस उपाय योजना जाहीर केली नाही. संजय गांधी किंवा राष्ट्रीय कुटुंब कल्याण या योजनेशी जोडायचे झाले तरी ही योजना दारिद्ररेषेखालील कुटुंबासाठी आहेत. त्यामुळे या महिला निकषात बसण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या विधवा महिलांचे संसार उघड्यावर राहील का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोदी सरकारशी पंगा अंगलट! ट्विटरवर पॉक्सो, आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणात बीडच्या इरफान शेखला दिल्लीत अटक
- ग्रामविकास निधीवर डल्ला; डेप्युटी सीईओला ७ वर्षे सश्रम कारावास
- मारहाण झालेल्या रिक्षाचालकाची शिवसेना आ.दानवे यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार
- पीकविमा देण्यास टाळाटाळ; विमा कंपनीसह केंद्र, राज्य सरकारला खंडपीठाची नोटीस

