औरंगाबाद : शहरासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या १६८० कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र याचे काम अतिशय संथगतीने सुरु होते. या अंतर्गत नवीन ५३ जलकुंभ बांधले जाणार आहेत. मात्र या जलकुंभांच्या डिझाइनला नागपूर येथील व्हीएनआयटीने आजपर्यंत मंजुरी दिलेली नव्हती. लॉकडाऊनमुळे प्रशासकीय काम बंद असल्याने ही मंजुरी अडकली होती. आता व्हीएनआयटीने फेब्रुवारी महिन्यात पाठवलेल्या ९ जलकुंभांच्या डिझाइनला मंजुरी दिली असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला ते नुकतेच प्राप्त झाले आहे. हे डिझाइन प्राप्त झाल्यामुळे आता जलकुभांच्या कामांना गती मिळणार आहे.
सुवर्णजयंती नगरोत्थानअंतर्गत राज्य सरकारने औरंगाबाद शहरासाठी १६८० कोटींची नवीन जलयोजना केलेली असून या या योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला (एमजेपी) दिलेले आहे. एमजेपीच्या माध्यमातून तीन वर्षात या योजनेचे काम पूर्ण केले जाणार आहे. या योजनेअंतर्गत शहरात नवीन पन्नास जलकुंभ बांधले जाणार आहेत. पन्नास पैकी अकरा जलकुंभांचे बांधकाम सध्या सुरू केलेले आहे. या अकरा जलकुंभांमध्ये टिव्ही सेंटर येथे दोन जलकुंभ, हरसिध्दीनगर, शिवाजी मैदान, गरवारे स्टेडियम, केटली गार्डन, पारिजातनगर, हर्सुल जलशुध्दीकरण केंद्र, हिमायतबाग या ठिकाणच्या जलकुंभांचा समावेश आहे.
जलकुंभांच्या कामाचे भूमिपूजन फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. त्याचवेळी एमजेपीने जलकुंभांचे डिझाइन मंजुरीसाठी नागपूर येथील व्हीएनआयटी (विश्वेश्वरय्या नॅशनल इस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी) या संस्थेकडे पाठवले होते. या संस्थेकडून डिझाइनला मंजूरी मिळण्याची प्रतीक्षा प्राधिकरणाला होती. मध्यंतरीच्या काळात कोरोना प्रादुर्भावामुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये सर्वच शासकीय, नीम शासकीय, खासगी कार्यालयांचे काम थंडावले होते. त्यामुळे व्हीएनआयटी संस्थेने देखील जलकुंभांचे डिझाइन ठेऊन घेत त्यावर आजपर्यंत निर्णय दिलेला नव्हता.
महत्त्वाच्या बातम्या
- माकडाने आख्या गावाला केले परेशान, गाड्यांच्या काचांसह टीव्हीही फोडला
- पोलीस स्टेशनला येऊ शकत नाही, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तपासात सहकार्य करू – ट्वीटर
- ‘अजित पवार मोकळे कसे ? त्यांना कायदा लागू होत नाही का ?’; अतुल भातखळकरांचा सवाल
- केंद्राचा धडाका ; आता ‘या’ दोन मोठ्या बँकांचंही होणार खासगीकरण
- डॉक्टरांची अशीही बांधिलकी, धन्वंतरी असोसिएशनच्या माध्यमातून १० हजार वृक्ष लागवड

