मुंबई: ‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkaal) यांचे काल (४ जानेवारी) रात्री ८ वाजून १० मिनिटांनी वयाच्या ७४ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.त्यांच्यावर पुण्यातील गॅलक्सी रूग्णालयात उपचार सुरू होते. पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटल येथे त्यांचे काल निधन झाले. सिंधुताई यांच्या निधनानंतर राज्यभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Congress state president Nana Patole) यांनीही सिंधुताई यांच्या निधनाने शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.
सिंधुताई सपकाळ यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करताना नाना पटोले म्हणाले की, हजारो अनाथांची माय असणा-या सिंधुताई सपकाळ यांचे संपूर्ण आयुष्य अत्यंत खडतर होते. अनेक कठिण प्रसंगांना सामोरे जात संघर्ष करत त्यांनी हजारो अनाथांना मातृछत्र दिले. अडचणी आणि अडथळ्यांचा सामना करत अनाथ मुलांचा आपल्या पोटच्या लेकरांप्रमाणे त्यांनी सांभाळ केला. त्यांच्या या महान कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने त्यांना अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन तर भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. सिधुंताईच्या अकस्मित निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. अशा शब्दांत नाना पटोले यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
अनाथांची माय, ज्येष्ठ समाजसेविका, पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाची बातमी मिळाली.
महाराष्ट्राची माय, अनाथांची माय आमच्यात नाही, याचा दुःख आज महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला आहे.
त्यांना महाराष्ट्र कॉंग्रेस तथा माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/ybCT2HxLeQ
— Nana Patole (@NANA_PATOLE) January 4, 2022
सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला होता. नको असताना मुलगी झाली म्हणून त्यांचे नाव चिंधी ठेवले होते. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. त्यांचे वडील अभिमान साठे गुरे वळायचे काम करायचे. अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली.१९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. या ठीकाणी लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. अशा लाखो जीवांच्या कैवारी सिंधुताई यांना सुमारे ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दरम्यान आज पुण्यात ठोसर पागा येथे सिंधुताई यांचा दफनविधी करण्यात येईल. महानुभाव पंथाच्या अनुयायी असल्याने दफनविधी करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
- अनाथांची माय अनाथ करून गेली…! सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन
- सिंधूताई जेव्हा मुख्यमंत्र्यांना प्रोत्साहन देतात, “केवढी आव्हानं रे तुझ्यासमोर लेकरा..”
- आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती- मुख्यमंत्री ठाकरे
- सिंधुताईंच्या निधनाने हजारो अनाथांचे मातृछत्र हरपलं-अजित पवार
- अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या आईला हृदय विकाराचा झटका, रुग्णालयात दाखल


