🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहा रुपयातील शिवाभोजन थाळीला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली. त्यानंतर राज्यातील काही जिल्ह्यात प्रायोजिक तत्त्वावर ही शिवभोजन थाळी सुरू करण्यात येणार आहे. ही योजना प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यासाठी तीन महिन्यात 6 कोटी 48 लक्ष खर्च अपेक्षित आहे.
अनुदानित ‘शिवभोजन’ थाळीची किंमत शहरी भागामध्ये प्रतिथाळी ५० रुपये आणि ग्रामीण भागामध्ये ३५ रुपये असणार आहे. प्रत्येक ग्राहकाकडून मिळालेल्या १० रुपयाव्यतिरिक्त उर्वरित रक्कम अनुदान म्हणून थेट जिल्हाधिकाऱ्यांना दिली जाईल. त्यानंतर ती रक्कम त्यांच्यामार्फत संबंधितांना वितरित करण्यात येईल. शहरी भागासाठी प्रतिथाळी 40 रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रतिथाळी 25 रुपये अनुदान असेल.
शिवाभोजानालय सुरु करण्यासाठी पुढील बाबी असणे आवश्यक :
शिव भोजनालय सुरु करू इच्छिणाऱ्या व्यक्तीकडे स्वत:ची पर्याप्त जागा असणे गरजेचे आहे. योजना राबविण्यासाठी सद्य:स्थितीत सुरू असलेल्या खानावळ, महिला बचतगट, भोजनालय, रेस्टॉरंट, अशासकीय संस्था यापैकी सक्षम असलेल्या भोजनालयाची निवड करण्यात येईल. त्यासाठी महापालिका स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तर तालुका स्तरावर तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल. गरीब किंवा मजूर लोकांची वर्दळ जास्त असलेल्या जिल्हा रुग्णालये, बस स्थानके, रेल्वे स्थानक परिसर, बाजारपेठा, शासकीय कार्यालये यासारख्या ठिकाणी थाळीची विक्री केली जाईल.
स्वयंसेवी संस्थांचाही सहभाग असणार :
योजनेवर संनियंत्रण, पर्यवेक्षण ठेवण्यासाठी राज्य स्तरावर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती नेमण्यात येणार आहे. सर्व पर्यायांचा विचार करून योजनेचा पुढील टप्पा ठरविण्याची कार्यवाही ही समिती करेल. तसेच सेंट्रल किचन, नामवंत स्वयंसेवी संस्था, सार्वजनिक न्यास व सीएसआर इत्यादींच्या सहभागाबाबत निर्णय घेईल व शासनाच्या सहभागाचे स्वरूप ठरवेल. त्याचप्रमाणे, ही योजना शाश्वत व टिकाऊ होण्यासाठी समिती क्रॉस सबसिडी व सार्वजनिक- खाजगी भागीदारी चे तत्व वापरण्यावर भर देईल.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
