🕒 1 min read
मुंबई : ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची चाहूल लागली आहे. महाविकास आघाडीत सहकारी असणाऱ्या कॉंग्रेसने स्वबळावर निवडणूक लढण्याचा चंग बांधलेला दिसतो आहे. भाजपने या अगोदरच हैदराबाद महानगर पालिकेच्या निवडणुकीत चांगलं यश मिळवल्यानंतर, मुंबई महानगर पालिकेवर सुद्धा भगवा फडकवू असा निर्धार केला आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व पक्ष कामाला लागले आहेत. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र आल्याने भाजप एकाकी पडला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये या तिन्ही पक्षांना अधिक कडवं आव्हान देण्यासाठी भाजप मनसेची साथ घेणार का अशा चर्चा रंगल्या आहेत. अशातच शिवसेनेच्या नेत्या व मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.
ही भेट स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यासंदर्भात असल्याचे समोर आले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष यशोधर फणसे यांनी ऑक्टोबर २०१५ मध्ये गटनेत्यांच्या बैठकीत मांडला होता. दक्षिण मुंबईत गेटवे ऑफ इंडिया जवळील रिगल सिनेमा, छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयासमोरील चौकात बाळासाहेबांचा पुतळा उभारला जाणार होता. मात्र, ही जागा छोटी असल्याने पुतळ्याची जागा बदलण्यात आली होती.
त्यामुळे हा पुतळा आता दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टस या इमारतीसमोर डॉ.शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये उभारण्यात आला आहे. पुतळ्याची उंची ९ फूट आहे. या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यास निमंत्रण देण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांची भेट घेतली. तसंच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही भेटणार असल्याचं, महापौर किशोरी पेडणेकर सांगितलं. दरम्यान, या सोहळ्यामुळे उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे एकत्र येणार असल्याने उत्सुकता वाढली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मी नरेंद्र मोदी किंवा भाजपला घाबरत नाही, मी स्वच्छ चारित्र्याचा आहे : राहुल गांधी
- ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ खडसेंचं लक्ष्यवेधी ट्विट
- विमानतळाचे नाव होणार छत्रपती संभाजीराजे विमानतळ-अतुल सावे
- ‘स्टेअरिंग ठाकरेंच्याच हातात, अडथळे अनेक पण त्यांची गाडी व्यवस्थित चाललेली आहे’
- ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने मी-मी म्हणणाऱ्यांचा माज उतरला, नाव न घेता अर्जुन खोतकरांचा दानवेंना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
