🕒 1 min read
बीड : मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे उभे पीक वाहून गेले. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी ओला दुष्काळ जाहीर करून सॅटेलाइटद्वारे उपलब्ध असलेल्या नुकसानीच्या माहितीआधारे तत्काळ मदतीची घोषणा करावी, अशी मागणी शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केली आहे.
अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यातील सोयाबीन, कपाशी, तूर, उडदाचे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी पूर्ण अडचणीत आलेला असून शेतीचे नुकसान झाले आहे. आता साधारणतः चार ते पाच वर्षे तरी जमीन व्यवस्थित होणार नाही, अशी परिस्थिती निर्माण आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर करावी, असे आवाहन आमदार मेटे यांनी केले आहे.
यावर्षी सातत्याने पूर, अतिवृष्टीमुळे राज्यात ४३६ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. मुख्यमंत्र्यांनी ही सगळी परिस्थिती गांभीर्याने घेऊन तत्काळ मदतीची घोषणा करायला हवी, शासनाकडे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचा सॅटेलाइट डाटा उपलब्ध आहे. नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा शेतकऱ्यांना थेट मदत देण्यात यावी. कारण मागील वेळी पंचनामे केलेली रक्कम अजूनही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. केवळ कागदी घोडे नाचवण्यात काहीही अर्थ नाही, असे आमदार मेटे यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- उत्तर प्रदेशमध्ये आंदोलनाला हिंसक वळण; जिप्सी जाळली, अखिलेश पोलिसांच्या ताब्यात
- घरी जा, गुगलवर ‘टरबूज ऑफ महाराष्ट्र’ सर्च करा; खडसेंनी कार्यकर्त्यांना सांगितले काम
- ‘शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते, लाठ्या-काठ्या उचला, अन् जशास तसे उत्तर द्या’
- ‘शेतकऱ्यांना चिरडणं ही भाजपची ‘पॉलिसी’ आहे का?, त्यांना असं चिरडणं म्हणजे ब्रिटीशी वागणूक’
- तेही म्हणत असतील कारखान्याला माझे नाव देऊन वाट लावली- अजित पवार

