🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मंत्रालयात सहाव्या मजल्यावर आपल्या दालनात प्रवेश करुन कामकाजाला प्रारंभ केला. शपथविधीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने कामकाजाला सुरुवात केली होती. परंतु आज प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील आपल्या दालनात दाखल झाले. तसेच त्यांनी लगेचच विविध विषयांवरील बैठकांना उपस्थिती दर्शवून अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, वडील संभाजी शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे, नातू रुद्रांश उपस्थित होते. यावेळी काही आमदारांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांना सदिच्छा दिल्या. यावेळी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनीदेखील मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती.
यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात प्रवेश केल्यावर छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले.
मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेताच त्यांनी कामाचा धडाका लावला आहे. कालपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ते अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांना लागेल ती मदत करा मी आहे, असं बोलताना दिसत आहेत. सांगली येथील रस्ते अपघातात जखमी झालेल्या सर्व वारकऱ्यांवर तातडीने उपचार करून गरज पडल्यास त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.
मिरजचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून या अपघाताबाबत माहिती घेऊन या वारकऱ्यांवर स्वखर्चाने उपचार करण्याची तयारी शिंदे त्यांनी दर्शवली आहे. या व्हिडिओनंतर एकनाथ शिंदेंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यानंतर शिंदे याचा आता दुसरा व्हिडीओ समोर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः व्हिडीओ कॉलद्वारे वारकऱ्यांशी संवाद साधून चौकशी केली.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
