🕒 1 min read
पंढरपूर : मराठी भाषिकांच्या हक्कासाठी व बेळगाव-निपाणी भागाचा महाराष्ट्रात समावेश करण्यासाठी स्थानिक नागरिक गेली अनेक दशके महाराष्ट्र एकीकरण समितीमार्फत लढा देत आहेत. बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली असून १७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
या जागेसाठी मराठी भाषिक एकवटले आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे शुभम शेळके या युवकाने शड्डू ठोकला आहे. त्यांना मोठ्या दडपशाहीचा सामना करावा लागत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. निवडणुकीची तारीख जस जशी जवळ येतेय तस तसा शेळकेंना मराठी भाषिकांचा मोठा पाठींबा मिळत आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या या मराठमोळ्या उमेदवाराला शिवसेनेनं जाहीर पाठींबा दिल्याचे घोषित केले होते. एवढच नाही तर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी शुभम शेळकेंच्या प्रचारासाठी बेळगावात येण्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार ते बेळगावात दाखल झाले आहेत.
दरम्यान, संजय राऊत यांची काल संयुक्त महाराष्ट्र चौकात सभा होणार होती. मात्र, कानडी प्रशासनाने साऊंड स्पिकर्ससह व्यासपीठाची मोडतोड केल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. संजय राऊत हे सभा घेण्यावर ठाम होते. यानंतर, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांसह संजय राऊत, खासदार धैर्यशील माने, शुभम शेळके, शिवसेनेचे कार्यकर्ते आणि मराठी भाषिक यांच्या उपस्थितीत भव्य रोड शो काढण्यात आला होता.
त्यानंतर आज संजय राऊत यांनी बेळगावात पत्रकार परिषद घेत भाजप नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना बेळगावात प्रचारास न येण्याचे आवाहन केले आहे. नितीन गडकरी हे मोठे नेते आहेत. ते केवळ विदर्भाचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यामुळे नितीन गडकरी यांनी बेळगावातील लोकसभा पोटनिवडणुकीत मराठी उमेदवाराविरोधात प्रचार करण्याची बेईमानी करु नये, असे संजय राऊत यांनी सांगितले. ते गुरुवारी बेळगावात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे. ‘संजय राऊत यांचं कसं आहे, की अमेरिका, इंग्लंड, बेळगांव हे त्यांना माहिती असतं. आम्ही सामान्य माणसं आहोत. संजय राऊत ते कोणालाही सल्ला देऊ शकतात. अमेरिकेच्या, इंग्लंडच्या अध्यक्षांनाही सल्ला देतात, तर ते गडकरींनाही देऊ शकतात, असा टोला चंद्रकांतदादांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या
- तीन दिवस रांगेत थांबूनही रेमडिसिव्हीर मिळेना, पुण्यात रुग्णांच्या नातेवाईकांचे आंदोलन
- ‘शेतकरी, सलून चालक, फुल विक्रेते, मुंबईचे डबेवाले आणि छोट्या व्यावसायिकांनाही आर्थिक मदत द्या’
- ब्रेक द चेन! जालना जिल्ह्यात कडक निर्बध लागू, विनाकारण फिरण्यास मनाई
- विराटने दिलेल्या ‘त्या’ ऑफरबाबत मॅक्सवेलकडून खुलासा
- नितीन गडकरींनी बेळगावात मराठी उमेदवाराविरोधात प्रचार करण्याची बेईमानी करु नये – संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

