🕒 1 min read
मुंबई: राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (NCP MP Amol Kolhe) यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावरुन आता नवा वाद रंगला आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याने वाद निर्माण झाला आहे. नथुराम गोडसे यांची भूमिका साकारल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. आता यावरूनच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
“एक अभिनेता म्हणून त्यांनी नथुराम गोडसेची भूमिका करणं यात मला काही चुकीचं वाटत नाही. ते नथुराम गोडसेच्या विचाराच्या बाबतीत संमत आहेत का, हे त्यांनी एकदा जाहीर करावे. ती विरोधाची भूमिका मावळली का हा मुद्दा आहे. तसेच अभिनेता कोणाचीही भूमिका करु शकतो. नथुराम गोडसेची करु शकतो…अफझल खानाचीही करु शकतो. त्याला काय होतं. म्हणजे मला नथुराम गोडसे अफझल खान आहे असं म्हणायचं नाही. सध्या संवेदनशील वातावरण असल्याने कशावरुनही वाद निर्माण होऊ शकतो त्यामुळे अफझल खान बाजूला ठेवू. पण एक अभिनेता कोणाचीही भूमिका करु शकतो.” असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया-
२०१७ साली या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. ज्यावेळी कोणत्याही सक्रिय राजकारणात नसताना मी ही भूमिका साकारली होती. एखादी भूमिका करतो म्हणजे त्या विचारधारेसोबत सहमत असतो असे कलाकार म्हणून कधीच नसते. काही विचारांसोबत आपण सहमत असतो. तर काही विचारधारांसोबत सहमत नसतानाही आपण ती भूमिका करतो. माझ्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्यातसुद्धा नथुराम गोडसेचे उदात्तीकरणाच्या संदर्भात मी कधीही भूमिका घेतलेली नाही. केवळ एक कलाकार म्हणून भूमिका साकारणे आणि त्याचा राजकीय विचारांसोबत संबंध जोडला जाणे या दोन विभिन्न गोष्टी आहेत. असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीने भूमिका स्पष्ट करावी-
आता यावरूनच विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर ( Leader of Opposition Praveen Darekar) यांनी राष्ट्रवादीने आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी असे आव्हान दिले आहे.देशामध्ये कलाकार म्हणून प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. अमोल कोल्हे हे केवळ अभिनेते नसून ते एका पक्षाचे सदस्य आहेत आणि लोकप्रतिनिधी व खासदार आहेत. त्यामुळे आता आपल्या पक्षाची नेमकी भूमिका काय हे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. जनता आज विचारते आहे की, नेमकी राष्ट्रवादीची भूमिका काय आहे. हा कलाकार ज्यावेळी छत्रपतींची भूमिका साकारत होता, त्यावेळी मी ही भूमिका जगतोय, भूमिका प्रत्यक्षात वागतोय अशी वक्तव्ये आम्ही ऐकले आहेत. मग आता त्या कलेला, भूमिकेला न्याय देताना आपण तेच करणार आहात का? असा सवालही प्रवीण दरेकर यांनी केला आहे. यासंदर्भात कॉंग्रेसनेही भूमिका स्पष्ट केली आहे. हुसेन दलवाई यांनी हे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. तसेच राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनीही म्हटले आहे की, अशाप्रकारची भूमिका घेणे चुकीचे आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीनेच आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी असे प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- “अमोल कोल्हेंच्या भूमिकेला आमचा विरोध नाही”, राष्ट्रवादीने स्पष्ट केली भूमिका
- राष्ट्रवादीने आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी; अमोल कोल्हेंच्या भूमिकेवरून भाजपचे आव्हान
- कोरियोग्राफर रेमो डिसूजाच्या मेव्हण्याने केली आत्महत्या? बहिण लिजेलने केला धक्कादायक खुलासा
- लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरेंनी पटकावले चौथे स्थान
- “झेब्रा क्रॉसिंग नीट रंगवायला अक्कल लागते का?”, मनसेचा मुख्यमंत्री ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
