मुंबई : भारतीय जनेता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची फेरनिवड करण्यात आली आहे, अशी घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केली. चंद्रकांतदादा पाटील हे महाराष्ट्र भाजपचे अध्यक्षपद सांभाळतील, तर आमदार मंगलप्रभात लोढा यांनाही पुन्हा मुंबई अध्यक्षपदी कायम ठेवण्यात आले आहे.
सध्या तरी महाराष्ट्र भाजपमध्ये कोणतेही मोठे बदल करण्यात आलेले नाहीत. याबाबत भाजपने एक अधिकृत पत्रक काढून माहिती दिली आहे. मात्र, ही निवड किती काळापर्यंत असणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
विधानसभा निवडणुकीआधी महाराष्ट्र भाजपत खांदेपालट झाला होता. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे केंद्रात राज्यमंत्री झाले होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सोपवण्यात आली होती.
प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.‘भाजप प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा माझी निवड झाल्याबद्दल आनंद आणि अभिमानही व्यक्त केला. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘नजीकच्या काळात घटनात्मक रचना पुन्हा नीट करण्याचं मोठं आव्हान आहे. अचानक गेलेल्या सरकारमुळे जी मरगळ आली, ती झटकून कार्यकर्ते पुन्हा एकदा कसे जोमाने कामाला लागतील, हे पाहणार आहे.’
ते पुढे म्हणाले, ‘आमचे सरकार नाहीये, त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून सक्षम भूमिका कशी बजावावी, यासाठी प्रयत्न करायचा आहे. ठाकरे सरकारने आधीच्या सरकारची प्रत्येक गोष्ट करण्याचा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. रद्द करताय तर पर्याय द्या, असं आव्हानही चंद्रकांत पाटलांनी दिलं.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
