औरंगाबाद : नगरसेवक महापौर ते आता थेट केंद्रीय मंत्री असा राजकीय प्रवास करणाऱ्या डॉ. भागवत कराड यांच्यावर आता पक्षाद्वारे संपूर्ण मराठवाड्याची जबाबदारी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाने डॉ. कराड यांच्या नेतृत्वाखाली येत्या १६ ऑगस्टपासून जन आशीर्वाद यात्रा काढणार आहे. यानिमित्ताने कराड यांचे नेतृत्व रुजवण्याचा प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे. पंकजा मुंडे यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर हा बदल औरंगाबाद जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा उत्साह नक्कीच वाढवेल.
केंद्रीय मंत्री पदाच्या शर्यतीत असलेल्या खासदार प्रीतम मुंडे यांचा पत्ता शेवटच्या क्षणी कापण्यात आला. नवख्या असलेल्या मराठवाड्याच्या डॉ. भागवत कराड यांना केंद्रीय मंत्रीपदाची लॉटरी लागली. नंतर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजीचे नाट्य उभे राहिले. पंकजा मुंडेंनी मुंबईत समर्थकांचा मेळावा घेतला. पक्ष नेतृत्वावर दबाव टाकण्याचा त्यांचा प्रयत्न मात्र यशस्वी झाला नाही. दुसरीकडे डॉक्टर कराडांना सातत्याने बळ मिळत असल्याचे दिसून येत आहे.
केंद्रीय मंत्री पदाच्या जबाबदारी नंतर आता संपूर्ण मराठवाड्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. महापौर पदाचा अनुभव असलेल्या कराडांना पक्षाने थेट राज्यसभेत पोहोचवून त्यांची उंची वाढवली आहे. कराडांच्या रुपाने मराठवाड्याला नवीन नेतृत्व मिळाल्याचे बोलले जात आहे. मराठवाड्यामध्ये भाजपचे नेतृत्व कुणाकडे हा प्रश्न आतापर्यंत अनुत्तरित होता. मात्र डॉ. कराड यांच्या रूपाने हा प्रश्न आता मिटला आहे.
भारतीय जनता पार्टी येत्या १६ ऑगस्टपासून मराठवाडास्तरीय जन आशीर्वाद यात्रा काढणार आहे. या यात्रेच्या निमित्ताने शहरात रविवारी (दि.८) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला शहराध्यक्ष संजय केनेकर, अतुल सावे, प्रमोद राठोड, मनोज पांगारकर आदींची उपस्थिती होती. १६ ते २० ऑगस्ट या दरम्यान ही यात्रा होणार असून भारतीय जनता पार्टीच्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न या यात्रेतद्वारे करण्यात येणार आहे. डॉ. कराड यांना पक्ष पुढे करत असल्याने पंकजा यांना पर्याय निर्माण केला जात असल्याचे आता उघडपणे बोलले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…तर ओबीसी समाजाबरोबर मागासवर्गीय समाजही सुखी झाला असता’
- ‘मुख्यमंत्री लाईव्ह येण्याआधी अजितदादांनी केलेली घोषणा ही सर्व श्रेयाची लढाई’
- ‘पूरग्रस्त महाड व चिपळूणला वाढीव मदत द्या’: नाना पटोले
- ‘ती फक्त ट्रायल होती, त्यात एवढं काय भडकायचं ?,’ अजित पवारांचा भाजप नेत्यांना सवाल
- ‘ज्यांनी कधी दिलंच नव्हतं ते आज क्रीडा विद्यापीठ गेल्याचे ओरडत आहे’, आ.अंबादास दानवेंचा भाजपला टोला!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
