मुंबई : घरगुती गॅस सिलेंडर महागला असून सर्वसामान्यांना महागाईचा चांगलाच फटका बसला आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेलमध्येही ८० पैशांची वाढ करण्यात आली आहे. असे असतांनाच आता पुढील महिन्यापासून जीवनावश्यक औषधांच्या किमतीमध्ये देखील वाढ होणार आहेत. भारताच्या औषध किंमत प्राधिकरणाने शेड्यूल्ड औषधांच्या किमतीत १०.७ टक्के वाढ करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता ८०० हून अधिक औषधांच्या किमती वाढतील. केंद्र सरकारने शेड्यूल औषधांच्या किमती वाढवण्यास ग्रीन सिग्नल दिला असल्याने पुढील महिन्यापासून पेनकिलर आणि अँटीबायोटिक्स महाग होणार आहेत. दरम्यान, या मुद्द्यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून केंद्र सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की,‘कोरोना महामारीने माणसाचे ‘जीवन महाग आणि मरण स्वस्त’ अशी अवस्था केली होती. हे महाग झालेले जीवन कसेबसे ढकलण्याचा आणि आहे त्यात सुख मानण्याचा प्रयत्न सामान्य माणूस करीत आहे. मात्र, केंद्राने त्याचे हे जगणे आणखी महाग करणारी औषध दरवाढ आता लादली आहे. सुखाने जगायचेही नाही आणि दुःखाने आजारीही पडायचे नाही, अशी ही विचित्र कोंडी आहे. कोरोनाची चौथी लाट येईल किंवा न येईल, ती येऊच नये, पण रोज आदळणाऱ्या महागाईच्या लाटांचे काय? त्या कोणी रोखायच्या?.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘सामान्य जनतेने सुखाने जगूच नये अशीच एकंदर स्थिती सध्या आपल्या देशाची झाली आहे. कोरोना तूर्त आटोक्यात आला असला तरी महागाईच्या रोजच्या तडाख्यांनी सामान्य जनता हैराण झाली आहे. कोरोना निर्बंधांपासून जनतेने मोकळा श्वास घेतला असला तरी रोजच्या दरवाढीने तिचा श्वास गुदमरायची वेळ आली आहे. आता तर तब्बल ८०० औषधांच्या किमतीही दहा टक्क्यांनी वाढल्या आहेत. या दरवाढीला औषध किंमत प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे १ एप्रिलपासून विविध पेन किलर, ऍण्टिबायोटिक्स महाग होणार आहेत. रोजच्या जीवनात सर्वाधिक वापरली जाणारी पॅरासिटामॉलदेखील या दरवाढीतून सुटलेली नाही. कोरोनाच्या दोन वर्षांत सर्वाधिक वापर झाला तो पॅरासिटामॉल आणि ऍजिथ्रोमायसीन या गोळ्यांचा. मात्र आता त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. पॅरासिटामॉल तर आधीच तब्बल १३० टक्क्यांनी महाग झालेलेच आहे. त्यात आता आणखी दहा टक्क्यांची भर पडणार आहे. म्हणजे ताप, संसर्गजन्य आजार, हृदयविकार, रक्तदाब, अशक्तपणा अशा आजारांसाठी यापुढे जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.’
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022 GT vs LSG : हुडा, बदोनीमुळं लखनऊ सावरलं; गुजरातला मिळालं १५९ धावांचं आव्हान!
- IPL 2022 : …अन् दीपक हुड्डाची धमाकेदार खेळी बघून कृणाल पंड्याही झाला खूश; वाजवल्या टाळ्या!
- IPL 2022 : ‘जानी दुश्मन’ कृणाल-दीपक झाले लखनऊच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग; नेटकऱ्यांचे मजेदार मीम्स व्हायरल!
- IPL 2022 : शुबमन गिलनं घेतलेला ‘हा’ कॅच पाहिलात, तर तुम्हाला कपिल देव यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही!
- VIDEO : मॅच सुरू होऊन दोन मिनिटं झाली अन्..! पाहा शमीच्या पहिल्याच चेंडूवर कसा आऊट झाला केएल राहुल!


