🕒 1 min read
नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत हा विषय केंद्रस्थानी ठेवून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल वर्ष 2021-22 या वर्षासाठीचा; 3483236 कोटी रुपये खर्चाचा; देशाचा पहिला कागदविरहित अर्थात डिजिटल म्हणजेच अंकीकृत अर्थसंकल्प संसदेत सादर केला.
आरोग्य, आर्थिक भांडवल आणि पायाभूत सुविधा, आकांक्षी भारतासाठी सर्वसमावेशक विकास, मानवी संसाधनं, नवोन्मेश आणि ‘किमान सरकार कमाल काम’ हे या अर्थसंकल्पाचे सहा प्रमुख स्तंभ असल्याचं अर्थमंत्री म्हणाल्या. राष्ट्र सर्वप्रथम, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण, पायाभूत आणि आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा, सुशासन, युवकांसाठी संधी, सर्वांसाठी शिक्षण, महिला सशक्तिकरण आणि सर्वसमावेशक विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही या अंदाजपत्रकातून अधोरेखित होते असा दावा सरकारच्या वतीने करण्यात येत आहे.
हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता सत्ताधारी हा अर्थसंकल्प कसा उपयुक्त आहे हे जनतेला पटवून देत आहेत तर दुसऱ्या बाजूला विरोधक यातील त्रुटि जनतेसमोर विविध माध्यमातून मांडत आहेत.दरम्यान,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पातून अनेक अपेक्षा होत्या. पण केंद्र सरकारने दिशाहिन अर्थसंकल्प मांडून कोरोना आणि ढासळलेल्या अर्थव्यवस्थेमुळे पिचलेल्या सर्वसामान्यांची, शेतकरी, कामगार, व्यापारी आणि उद्योजकांची आणखी पिळवणूक करण्याचे काम केल्याची टीका राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्या अर्थसंकल्पीय भाषणावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, आयकर रचनेत कोणतेही बदल न झाल्याने मध्यमवर्गीय व नोकरदार कमालीचे नाराज आहेत असे देखील चव्हाण म्हणाले .
दुसऱ्या बाजूला चव्हाण यांच्या सुरात सूर मिसळत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी देखील सरकारवर टीका केली.कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी मोठ्या घोषणा होतील अशी अपेक्षा होती. मात्र केंद्रसरकारने कोणतीही मोठी घोषणा केली नाही. या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही न आल्यामुळे भुजबळ यांनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. भारताचा अर्थसंकल्प मांडताना यात महाराष्ट्र आहे की नाही असा सवाल देखील मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.
दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल सादर केलेलं अंदाजपत्रक हे आत्मनिर्भर भारताचं ऐतिहासिक अंदाजपत्रक आहे आणि या अंदाजपत्रकामुळे विविध क्षेत्रात मोठी प्रगती होणार असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. या अर्थसंकल्पामुळे लोकांच्या राहणीमानात सुलभता येईल त्याच बरोबर सर्व सामान्य नागरिक, गुंतवणूकदार, उद्योग आणि पायाभूत सुविधांसाठी अनेक सकारात्मक बदल घडून येतील असा विश्वास मोदी यांनी आपल्या ट्विट संदेशातून व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- रोहयो घोटाळा प्रकरणात ४७० जणांना नोटीसा; २० पथकांनी केली होती चौकशी
- #Budget2021 : मूठभर भांडवलदारांच्या हातात वीज क्षेत्र सोपविण्याचे मोदी सरकारचे कारस्थान : राऊत
- #Budget2021 : अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरीव तरतूद नाही; भुजबळांनी व्यक्त केली तीव्र नाराजी
- पुणेकरांची घोर निराशा करणारा मोदी सरकारचा अर्थसंकल्प – कॉंग्रेस
- शेतकऱ्यांना रोखताय की संपवताय? शेतकऱ्यांना आता दिल्लीत घुसणं अवघड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
