🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुका होताच राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे आता प्रत्येक राजकीय पक्ष हा विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी करताना दिसत आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवत केंद्रात सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे राज्यात देखील भाजपच सत्तेवर आणण्याचा चंग भाजप नेत्यांनी बांधला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बोलताना केंद्राप्रमाणे राज्यातही भाजपची सत्ता येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
नवी मुंबई उत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारने चांगले काम केले आहे. नवी मुंबई तसेच राज्यातील अनेक प्रश्न सोडविण्यात आले आहेत. जे प्रश्न सुटले नसतील ते पुढील तीन महिन्यांत सोडविण्यात येतील, असे आश्वासनही त्यांनी दिले. देशात सत्ता आली असून राज्यातही भाजपचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमात श्री गोवर्धनी संस्थेच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी ११ लाख रुपयांचा निधी देण्यात आला.कार्यक्र माला माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, सिडको अध्यक्ष प्रशांत ठाकूर, सुरेश हावरे, विजय चौगुले, नवी मुंबई पालिका आयुक्त एन. रामास्वामी आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर विरोधकांनी एकत्र येत भाजपला धुळीत मिळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप- सेना युती आणि कॉंग्रेस आघाडी यादोन्ही आघाडयाकडून जन्मात आपल्या बाजूने वळवून घेण्यासाठी विविध पद्धतीचा अवलंब केला जात आहे. तसेच विरोधकांनी बैठकांच सत्र देखील लावले आहे.

