🕒 1 min read
बीड : केज-अंबाजोगाईच्या भाजप आमदार नमिता मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा यांना अपशब्द वापरत शिवीगाळ करून धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. रस्त्याच्या कामावरून दोन महिन्यांपूर्वी हा प्रकार घडला होता. पण याची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालीये. याबाबत अक्षय मुंदडा यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
अक्षय मुंदडा हे माजी मंत्री दिवंगत विमलताई मुंदडा यांचे पूत्र आहेत. तसेच ते भाजपच्या केज मतदार संघातील विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांचे पती आहेत. तक्रारीत म्हटले आहे की, दोन महिन्यांपूर्वी ऋषिकेश अण्णासाहेब लोमटे यांचा फोन आला. त्याने फोनवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी संभाषण रेकॉर्ड करून घेतले. तर याप्रकरणी अक्षय मुंदडा यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर ठाण्यात कलम 500, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.
देवस्थानच्या रस्त्याच्या कामावरून हा वाद चव्हाट्यावर आला आहे. सुरुवातीला ऋषिकेश लोमटे यांनी कॉलवरून विनंती करत रस्त्याचे काम सुरू करू देण्याची मागणी केली. तुमच्या हाताने उद्घाटन करू काम करू द्या असे लोमटे हे सांगत असल्याचे ऑडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे. विनंती करूनही अक्षय मुंदडा यांनी न ऐकल्याने ऋषिकेश लोमटे याला राग अनावर झाला आणि त्याने शिवीगाळ सुरु केली. तसेच इकडे आला तर जीवे मारण्याची धमकी देखील दिली. दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेची कॉल रेकॉर्डिंग सोशल माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर आमदार पती यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नगरमध्ये उपसरपंचाच्या जाचाला कंटाळून ग्रामसेवकाची आत्महत्या
- ‘शेतकऱ्यांवर आस्मानी संकट कोसळलेय, सुलतानी संकट टाळा’, पंकजा मुंडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- ‘काळजी करू नका, तुम्हाला मदत मिळवून देणारच’, फडणवीसांची शेतकऱ्यांना ग्वाही
- ‘अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये शिवसेना संपविण्याचे काम केले’, सुभाष साबणेंचा आरोप
- ‘देशमुख व परमबीरपैकी एकाला ‘वर्षा’वर तर दुसऱ्याला ‘मातोश्री’वर लपवलेय!’, सोमय्यांचा गंभीर आरोप


