मुंबई- राज्यात परतीच्या पावसाने झालेले नुकसान प्रचंड मोठे आहे. अजूनही अतिवृष्टीचे संकट टळले नसून पुढील काही दिवस आणखी पावसाचा इशारा वेधशाळेने दिला आहे. मात्र नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून ते पूर्ण होऊ न संपूर्ण माहिती येताच प्रत्यक्ष मदत दिली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सोलापुरात स्पष्ट केले.
खरं तर स्वतः मुख्यमंत्री नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार असल्याने या भागातील नागरिकांना मोठ्या अपेक्षा होत्या मात्र मुख्यमंत्र्यांनी कोणतीही मोठी घोषणा न केल्याने शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली. भाजपने या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान केले आहे. भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी ठाकरे सरकार आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून टीका केली आहे. पाहूया नेमकी काय आहे शिवराय कुळकर्णी यांची फेसबुक पोस्ट?
देर आया लेकिन दुरुस्त नही !
अखेर मुख्यमंत्री मातोश्रीतून बाहेर पडले. महापुरात व अतिवृष्टी मध्ये सर्वस्व वाहून गेलेल्या शेतकऱ्याच्या बांधावर गेले नसले तरी नदीच्या उंच पुलापर्यंत गेले. दुरून दुरून जीवाला जपत पाहणी केली. आणि महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणजे या संकटाचे गांभीर्य समजून न घेता, कवडीची घोषणा न करता, थिल्लर राजकीय टोमणेबाजी करून मुख्यमंत्र्यांचे राजकीय पर्यटन आटोपले.महाराष्ट्रावर आलेले संकट भयंकर आहे. अशा संकटात तरी उद्धव ठाकरे आपले वेगळे किंवा गंभीर रूप दाखवतील अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली.
अतिवृष्टीचे ढगफुटीसारखे थैमान सुरू असताना मुख्यमंत्री बॉलीवूडच्या भवितव्यात गुंतले होते. वाचाळवीर संजय राऊत रोज चेहऱ्यावर मूळव्याध उमळल्याचा भाव आणून फडणवीसांचे उणेदुणे काढत असतात. त्याची महाराष्ट्राला सवय झाली आहे. मात्र, तोच अविर्भाव आता उद्धव ठाकरे यांनी देखील स्वीकारला आहे.
शेतकऱ्यांचे कष्ट, घाम आणि रक्तही वाहून जात असताना मुख्यमंत्री बॉलिवूडचा मुद्दा तापवत होते. थोडं मागे जाऊन बघा. फडणवीसांची कारकीर्द आठवून बघा. स्वतः मुख्यमंत्री अपडेट असायचे. तेव्हा सत्तेत राहून, राजीनामे खिशात ठेऊन तुम्ही देखील विरोधाचे तुणतुणे वाजवत बसायचे. पण देवेंद्रजी संकट निवारणासाठी सज्ज झालेले असायचे. तुम्हा सर्वांचा टीकेचा वर्षाव होत असताना ते आपल्या कर्तव्यपूर्ती पासून तसूभरही दूर सरकले नाही.शिवसेने चे लोक उद्धव ठाकरेंना शेतकऱ्यांचा कैवारी वैगेरे म्हणतात. फडणवीस काळजीवाहू मुख्यमंत्री होते तर पाऊस ओसरायच्या आत उद्धव ठाकरे शेतकऱ्याच्या बांधावर गेले होते. त्यांनीच वर्षभरापूर्वी पन्नास हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. त्यानंतर जनादेशाचा अनादर करत तुम्हीच मुख्यमंत्री पदावर बसलात. बरं ती मागणी आपल्या एकट्याची नव्हती. शरदराव पवार आणि तुम्ही सुरात सूर मिसळून बोलत होतात. तेव्हापासूनच तुमचं मिले सूर मेरा तुम्हारा, सुरू आहे.
जनाची नव्हे पण मनाची थोडी जरी शिल्लक असेल तर आज मातोश्रीचा उंबरा ओलांडताना आपणच केलेल्या मागणीचे स्मरण करून शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला जाणे, महाराष्ट्राला अपेक्षित होते. कोरोना संकटाला घाबरून आपण मुख्यमंत्र्याऐवजी मुनीमजी म्हणून कारभार हाकलला. याची कबुली खुद्द पवारांनीच दिली. उद्धव ठाकरे यांनी घरीच बसून नियोजन सांभाळण्याचे आम्हीच ठरवले होते, असे पवारांनी बांधावरच सांगितले. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री घरीच बसून राहतो म्हणजे काय तर मुनीम म्हणून काम करतो, हा अर्थ स्पष्ट आहे.बिहार सारख्या मोठ्या राज्यात निवडणुकीचा पक्षाचा प्रभार सोडून देवेंद्र फडणवीस नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार, याचा सुगावा लागताच मुख्यमंत्र्यांनी मुंबई सोडण्याचा अतिशय धाडसी निर्णय घेतला. गेले तर गेले पण शेतकऱ्याच्या बांधावर गेलेच नाही. पुलावरून पाहणी केली. पुलाखालून बरेच पाणी गेले, वैगेरे वाक्प्रचार कदाचित त्यांनी वापरलाही असेल ! फेसबुक लाईव्ह वर असेच काही असंबद्ध बोलण्याची त्यांना जडलेली सवय महाराष्ट्राला आता नवी नाही.
मोगल सरदारांच्या घोड्यांनाही पाण्यात संताजी – धनाजी दिसायचे आणि त्यांची पाणी पिण्याची हिंमत होत नसे. उद्धव ठाकरे यांचे तसेच काहीसे झाले आहे. फडणवीस आणि भाजपा या विषयीची धडकी भरली आहे त्यांना. अतिशय गंभीर प्रश्नावर स्वतः कवडीची घोषणा न करता उद्धव ठाकरे फडणवीसांचे सरकार केवळ घोषणा करीत होते आणि आता ते गेले, असा टोमणा मारायला विसरले नाही. कोरोना असो, कर्जमाफी असो, विकास कामे असो आणि आता नुकसान भरपाई असो, केंद्र सरकारकडे बोट दाखवण्याचा नेम ते चुकू देत नाही. महाराष्ट्रातले सर्व प्रश्न मोदींनी सोडवायचे तर मग तुम्ही काय करणार ?
आघाडी सरकार काय करणार ?मुख्यमंत्री फेसबुक लाईव्ह करणार. कंगनाच्या घरावर बुलडोझर चालवणार. म्हाताऱ्या खाष्ट सासू सारखे टोमणे मारणार. गाण्याच्या भेंड्या खेळणार. कोमट पाणी पीत घरीच बसणार. बहुतांशी कामांना स्थगिती दिली आता राहिलेल्या कामांना स्थगिती देणार. एक मंत्री एका निरपराध युवकाला बंगल्यावर नेऊन बेदम हाणणार. महिला मंत्री ड्युटीवर पोलिसाला झोडपणार. गृहमंत्री विरोधकांवर केसेस दाखल करणार. कृषिमंत्री पंचनाम्यांचे गुऱ्हाळ लावणार. दारूची दुकाने उघडून मंदिरे बंद ठेवणार. ऊर्जा मंत्री मुंबईचे ग्रीड फेल पाडणार. तुमच्या बाजूने बोलत नाही म्हणून न्यूज चॅनेल बंद पाडणार, पत्रकारांना तुरुंगात टाकणार, महिलांवर अत्याचार होत आहेत तेव्हा डोळ्यावर पट्टी बांधणार आणि संजय राऊत वाचाळगिरी करणार ! हे असेच चालू राहणार ! याचसाठी तर तुम्ही अट्टाहास केला होता. त्यासाठीच तर असंगाशी संग करून तुम्ही एकत्र आले !
महाराष्ट्राला आज वाटलं होतं, 22 मार्च पासून क्वारन्टाईन असलेले मुख्यमंत्री काही का असेना आज बाहेर निघाले तर ‘देर आया दुरुस्त आया’असे म्हणता येईल. पण ‘दुरुस्त नही’हेच खरे ठरले !दुसरीकडे जनतेच्या मनातला मुख्यमंत्री म्हणजे देवेन्द्र फडणवीस मात्र, चिखल माती तुडवत शेतकऱ्यांचे अश्रू पुसत फिरतो आहे. काही तरी भलं करण्याची क्षमता त्याचीच आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला चांगले ठाऊक आहे.– शिवराय कुळकर्णी (प्रवक्ता, भाजपा, महाराष्ट्र)
महत्वाच्या बातम्या-
- मुलाला पाहण्यासाठी राज ठाकरे पोहोचले थेट लीलावती हॉस्पिटलमध्ये
- चिनी सैनिकाचा भारतीय हद्दीत प्रवेश, लष्कराने घेतलं ताब्यात
- लोकप्रतिनिधीच महिलांना ‘आइटम’ म्हणत असतील तर इतरांनी काय आदर्श घ्यावा ?
- भाजप नगरसेवकांची मुंबईत महापौरांच्या विरोधात निदर्शने
- घरातील अन्नधान्य भिजलंय खायचं काय ? शेतकरी महिलेचा संभाजीराजेंना सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

