औरंगाबाद : युती तुटल्यानंतर औरंगाबाद महानगरपालिकेत युतीचा काडीमोड झाला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपने शहराचे ‘संभाजीनगर’ असे नामांतर करण्याचा विषय ऐरणीवर घेतला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची या शहराचे नामांतर करण्याची इच्छा होती. त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत.
त्यामुळे शहराच्या नामांतराचा ठराव घेऊन अंमलबजावणीसाठी राज्य शासनाकडे पाठविण्याचा प्रस्ताव भाजपने महापौरांना दिला होता. मात्र, यापूर्वीच ठराव मंजूर झाल्याने नव्याने ठराव घेण्याची गरज नाही, असे सांगत महापौरांनी भाजपचा प्रस्ताव बाजूला ठेवला आहे. सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा हा प्रस्ताव भाजप नगरसेवकांनी महापौरांना दिला.
शहराचे नामांतर करण्याची शिवसेनेची मागणी आहे. मात्र, राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्याने नामांतराचा विषय शिवसेनेसाठी अडचणीचा आहे. याचे राजकारण करण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी ‘संभाजीनगर’ नामांतरचा प्रस्ताव शिवसेनेच्या महापौरांना दिला होता. मात्र महापौरांनी हा विषय बाजूला ठेवला आहे. त्यामुळे मंगळवारी भाजपचे गटनेते प्रमोद राठोड, यांच्यासह इतरांनी महापौरांना स्मरणपत्र दिले.
सभेला सकाळी साडेअकराला सुरवात होताच शिवसेनेचे पदाधिकारी ज्याठिकाणी नेहमी बसतात त्या जागेचा भाजपच्या नगरसेविकांनी ताबा घेतला. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची गोची झाली. भाजपच्या काही नगरसेवकांनी ही खेळी खेळल्याचे लक्षात येताच शिवसेनेचे सदस्य भाजपच्या याच सदस्यांच्या जागेवर त्यांच्या जवळ जाऊन बसले. त्यामुळे सभागृहात वेगळेच चित्र पाहायला मिळाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

