मुंबई : दिवसेंदिवस राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढताना दिसतं आहे. याचप्रमाणे नगर जिल्ह्यात जामखेड 11 तर संगमनेरमध्ये 8 कोरोनाबाधित रुग्णसंख्या झाली आहे. यामुळे आता चिंतेत आणखीचं वाढ पडली आहे. तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन प्रचंड मेहनत घेत आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि अहमदनगर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी देखील अहमदनगर मध्ये वाढत्या कोरोना बाधित रुग्नांच्या संख्येमुळे चिंता व्यक्त केली आहे. ‘जामखेडमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 11 वर पोहोचल्याची माहिती मिळाल्यावर माझं मन सुन्न झालं. मला रात्रभर झोप आली नाही,’ असं शिंदे म्हणाले.
याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले, ‘लॉकडाऊन सुरु होऊन अहमदनगर जिल्ह्यात एक महिना पूर्ण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन प्रचंड मेहनत घेत आहे. रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवण्यात जिल्हा प्रशासनाला यशदेखील आलं,’ असं शिंदे म्हणाले.
दरम्यान, ‘तरीही जामखेड, अहमदनगर शहर, संगमनेर नेवासा या भागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत गेली. अखेर प्रशासनाला ही ठिकाणं कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून जाहीर करावे लागले, असं राम शिंदे म्हणाले.
‘बारामती येथे एक रुग्ण आढळल्यानंतर भिलवाडा पॅटर्न राबवून रुग्णांची संख्या पूर्णपणे नियंत्रणात आणली गेली त्याप्रमाणे जामखेडमध्येही भिलवाडा पॅटर्न राबवण्याची नितांत गरज आहे. शासनाने आणि प्रशासनाने निर्णय घेऊन त्वरित अंमलबजावणी करावी,’ अशी मागणी शिंदे यांनी केली.


