🕒 1 min read
मुंबई : राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे महविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणं कमालीची बदलताना दिसत आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील महाअधिवेशन घेत राजकीय कूस बदलत असल्याचे संकेत दिले. त्यामुळे शिवसेना महाविकास आघाडीत सामील झाल्यानंतर आता एकट्या पडलेल्या भाजप नेत्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी भेटीगाठी घेण्यास सुरवात केली असून दिवसेंदिवस या भेटीगाठी वाढताना दिसत आहेत.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात काही दिवसांपूर्वी मुंबईत गुप्त बैठक झाली. त्यानंतर आता भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी पुन्हा राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली. शेलार यांची ही राज ठाकरेंची दुसरी भेट आहे. राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. मनसेनं हिंदुत्वाच्या मुद्यावर वाटचाल सुरु केल्यानं भाजपशी जवळीक वाढल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता राजकीय चर्चांना उधान आले आहे.
तर काही दिवसांपूर्वी राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांचीही गुप्त बैठक झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी मनसेच्या मुंबईतील आझाद मैदानावरील मोर्चाच्या बरोबर आधी आशिष शेलार यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली. आता पुन्हा एकदा आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. त्यामुळे त्यांची राज ठाकरेंशी कोणत्या मुद्द्यावर चर्चा सुरु आहे याविषयी अनेकांना उत्सुकता लागली आहे.
राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांच्यात मुंबईत गुप्त बैठक झाली होती. प्रभादेवी येथील इंडिया बुल्स स्काय या हॉटेलमध्ये जवळपास तास- दीड तास ही भेट झाली होती. देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे यांच्या भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात नवी समीकरणं जुळताना दिसत आहेत. या भेटीनंतर राज ठाकरे हॉटेलच्या मागच्या गेटने बाहेर पडले. ही भेट अत्यंत गोपनीय होती. हा सर्व घटनाक्रम पाहता या गाठीभेटींमधून काय निष्पन्न होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

