भोपाळ : काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपच्या गोटात दाखल झालेले ज्योतिरादित्य सिंधिया पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटच्या बायोमध्ये भाजपचा उल्लेख काढून टाकल्याचे समजते. त्यामुळे मध्य प्रदेशच्या राजकारणात पुन्हा एकदा वादळ येण्याची शक्यता आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आता ट्विटरमधील बायोत स्वत:चा उल्लेख जनतेचा सेवक आणि क्रिकेटप्रेमी असा करायला सुरुवात केली आहे. यानंतर गदारोळ निर्माण झाल्यानंतरही सिंधिया यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात नवे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

ज्योतिरादित्य सिंधिया हे गेली १८ वर्षे काँग्रेसमध्ये होते. मात्र, होळीच्या दिवशी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपामध्ये गेल्यानंतर त्यांच्या समर्थकांना शिवराज मंत्रिमंडळात समावेश आणि केंद्रात त्यांना कॅबिनेट मंत्री बनविण्याची चर्चा होती. परंतु आता असे वृत्त येत आहे की, त्यांच्या समर्थक माजी आमदारांना पोटनिवडणुकीसाठी तिकीट मिळण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांना मातृशोक, भाजपच्या माजी आमदार चंद्रकांता गोयल यांचे निधन
भाजपाने पोटनिवडणुकीत ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या २२ समर्थक आमदारांना तिकिट देण्याचा दावा केला आहे. मात्र, आता या समर्थक आमदारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनके जागांवर भाजपाला आपल्या जुन्या नेत्यांमध्ये बंडखोरी दिसून येत आहे. हातपीपल्यातील दीपक जोशी असो किंवा ग्वाल्हेरमध्ये यापूर्वी काँग्रेसमध्ये सामील झालेले बेलेंदु शुक्ला असोत. भाजपाला आपल्या नेत्यांना पटवून देणे अवघड जात असल्याचे बोलले जात आहे. तसेच, ज्योतिरादित्य सिंधिया समर्थक माजी आमदारांच्या काही जागांवर विजय मिळविण्यावरही शंका उपस्थित होत आहे.


