🕒 1 min read
औरंगाबाद: मार्च २०२२ ला पंतप्रधान आवास योजनेची मुदत संपणार असुन केंद्र, राज्य व जिल्हा प्रशासनाच्या उदासिनता व कार्यपद्धतीवर गंभीर स्वरुपाचे आरोप खासदार इम्तियाज जलील(Imtiyaj Jaleel) यांनी केले असून पंतप्रधान घरकुल योजना म्हणजे ‘सपनो का घर सपने मे ही मिलेगा’ अशी टिका त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदीवर(Narendra Modi) केली होती. जलील यांनी केलेल्या टीकेला औरंगाबाद भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. भाजपला या योजनेचे श्रेय मिळू नये यासाठी महाविकास आघाडी शहरात या योजनेसाठी जागा मिळू देत नसल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला आहे.
खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान घरकुल योजनेबाबत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप केले होते. त्यानंतर बुधवारी भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी देखील पत्रकार परिषद घेत जलील यांना प्रत्युत्तर दिले. यावेळी त्यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, केंद्रातील मोदी सरकारने गरिबांना आपल्या हक्काचे घर मिळावे यासाठी घरकुल योजना राबवली.
ती योजना मोठ्या प्रमाणावर यशस्वी होत असतांना औरंगाबाद मध्ये असे काय घडले? याबाबत त्यांनी माहिती दिली. याबाबत ते म्हणाले, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी घरकुल योजनेसाठी जागा मिळावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोनदा पत्र लिहिले. मात्र यावर आतापर्यंत कुठलीही अंमलबजावणी झालेली नाही. ८८ हजार अर्जांपैकी ५५ हजार अर्जांना मान्यता मिळाली आहे. असे असतांना यापैकी केवळ ३५५ जणांना घरकुलाचा लाभ मिळाला. याला केवळ महापालिका, जिल्हाधिकारी व महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.
काय म्हणाले होते इम्तियाज जलील?
देशातील प्रत्येक गोरगरीब कुटुंबाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मार्च २०२२ पर्यंत सर्वांना जलजोडणी, शौचालयाची व्यवस्था, २४ तास वीज व पोहोच रस्ता या सुविधांसह पक्की घरे पंतप्रधान आवास योजनेतंर्गत देणार असल्याचे घोषित केले होते. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक गोरगरीब लोकांना सर्व सोयीसुविधायुक्त स्वत:ची पक्की घरे मिळणार असल्याचे जाहीर करुन कोटयावधी रुपयांचे होर्डिंग व जाहीराती लावून शासकीय पैशांचा गैरवापर करुन सर्वसामान्य गोरगरीब नागरीकांची चेष्टा केली आहे. असा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला होता.
महत्त्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
