🕒 1 min read
अहमदपूर : येथील पंचायत समितीच्या सभापती अयोध्या केंद्रे यांनी सभापतिपदाचा तसेच भारतीय जनता पक्षाच्या सभासदत्वाचा राजीनामा रविवारी दिला आहे. हा अहमदपूर- चाकूर विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठा झटका मानला जात आहे.
विधानसभेची निवडणूक जशी जवळ येत आहे, तशी भारतीय जनता पक्षातील अंतर्गत गटबाजी उफाळून वर येत आहे. त्यामुळे एकूणच अहमदपूर- चाकूर विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापावयास सुरवात झाली आहे. भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच चालू आहे. त्यात पंचायत समितीच्या सभापती अयोध्या केंद्रे, त्यांचे पती जिल्हा परिषद सदस्य अशोक केंद्रे हे भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी वर्ष 2009 च्या विधानसभा निवडणुकीपासून उत्सुक होते; मात्र त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही.
याबरोबरच सद्यःस्थितीत अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी विद्यमान आमदार विनायक पाटील, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, प्रदेश सदस्य दिलीपराव देशमुख, बाजार समितीचे माजी सभापती ऍड. भारत चामे हे आघाडीवर आहेत. त्यामुळे एकूणच भाजपमध्ये गटा-तटाचे राजकारण निर्माण झाले आहे. या गटबाजीला कंटाळूनच श्रीमती केंद्रे यांनी हा राजीनामा दिला आहे. विधानसभा निवडणूक त्या वंचित बहुजन आघाडीकडून लढवतील अशी चर्चा आहे.
अहमदपूर पंचायत समितीमध्ये भाजप नऊ, शिवसेना एक, राष्ट्रवादी कॉंग्रेस एक आणि कॉंग्रेस एक असे पक्षीय बलाबल आहे. त्यामुळे पंचायत समितीवर भाजपचे वर्चस्व कायम राहणार असले तरी, सभापती केंद्रे यांच्या भाजप सभासदत्वाच्या राजीनाम्यामुळे अहमदपूर-चाकूर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला जबर धक्का बसल्याचे मानले जात आहे.
देशमुखांचीही वेगळी वाट
भाजपचे प्रदेश सदस्य दिलीपराव देशमुख यांनीही मंगळवारी (ता.एक) जाहीर सभेचे आयोजन केले आहे. त्यादिवशी ते आपला उमेदवारी अर्जही दाखल करणार आहेत. त्यामुळे त्यांनीही आपली वेगळी वाट निवडली असल्याने, भाजपला हा दुसरा धक्का मानला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1178947875981557761?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1178947488100675585?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1178945507231535104?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
