🕒 1 min read
औरंगाबाद: विविध प्रकारच्या विकास योजनांसाठी शासन निधी देत आहे. याशिवाय महानगरपालिकेने सुद्धा इतर पालिकांप्रमाणे उपाय योजना करून आपला स्वनिधी उभारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. नवीन उत्पन्न स्रोत निर्माण केले पाहिजे यासाठी शासन मदत करेलच असे प्रतिपादन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. महानगरपालिका मुख्यालयात शनिवारी (दि. १३) एकत्रित विकास नियमावली (युनिफाईड डिसीआर )अंमलबजावणी व विकास कामांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
विकास आराखड्याच्या मुद्द्यावर बोलताना शिंदे म्हणाले की, प्रस्तवित विकास आराखड्यानुसार डीपी रोड बाबतची आखणी वारंवार करावी जेणे करून अनधिकृत बांधकामे होणार नाहीत आणि नागरिकांना याची जाणीव होऊन भविष्यात या ठिकाणी अनधिकृत वस्ती, प्लॉटिंग होणार नाहीत. याबाबत महानगरपालिकेने त्वरित अंमलबजावणी करावी. नवीन युनिफाईड डिसीआर नियमावली नुसार देण्यात येणाऱ्या एफएसआयचा गैरवापर होणार नाही. नवीन घरे घेणाऱ्यांची फसवणूक होणार नाही.
अतिरिक्त क्षेत्रफळ वाढल्यामुळे घरांच्या किमती नियंत्रणात राहणार आहेत. तसेच १५०० स्क्वेअर फूट पर्यंत परवानगीची गरज राहणार नाही. आणि ३ हजार स्क्वेअर फूट पर्यंतच्या बांधकाम परवानगीसाठी नागरिकांनी रीतसर अर्ज दाखल केल्यानंतर मनपाने १० दिवसात परवानगी दिलीच पाहिजे असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
नवीन तयार होणाऱ्या इमारती मधील सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आणि इतर कार्यक्रमासाठी एक मजल्यासाठी एफएसआय देण्यात येणार आहे. तसेच त्यांनी यावेळी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी एकत्रित काम करून शहराच्या विकासासाठी प्रयत्न करावे असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी महानगरपालिकेतर्फे हाती घेण्यात आलेल्या विविध योजना आणि प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली. यावेळी युनिफाईड डिसीआर अंमलबजावणीबाबत सहायक संचालक नगर रचना विभाग जयंत खरवडकर यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे सादरीकरण केले.
या बैठकीस रोहियो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, राज्य मंत्री अब्दुल सत्तार, माजी विधान सभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, प्रधान सचिव महेश पाठक, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, माजी खा .चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, उदय सिंग राजपूत, माजी आमदार कल्याण काळे, महानगरपालिकेचे माजी पदाधिकारी नंदकुमार घोडेले, स्मार्ट सिटीचे अधिकारी यांची उपस्थिती होती.
महत्वाच्या बातम्या
- शिक्षण मंत्री महोदया कृपया हे थांबवा…आमदारांचा घरचा आहेर
- मी माजी पंतप्रधानांचा मुलगा असलो तरी तत्वासाठीची लढाई सोडून देणार नाही
- लातुर मध्ये शासकीय कर्मचाऱ्यांनी घेतली कोरोना लस
- Fact Check : एप्रिल महिन्यात सर्व प्रवासी रेल्वेगाड्यांच्या सेवा पुन्हा सुरू होणार ?
- १५०० स्वेअर फूटापर्यंतच्या बांधकामाला परवानगीची गरज नाही- शिंदे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
