नवी दिल्ली : मुंबईच्या खार पोलीस स्टेशनमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार नोंदवल्यानंतर आता खासदार नवनीत राणा यांनी थेट दिल्ली पोलिसांकडे संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार केली आहे. राणा यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांकडे तक्रारीचं पत्र पाठवले आहे. राऊत यांनी आपल्याला ‘चारसो बीस’ म्हणत बदनामी केल्याचा नवनीत राणा यांचा आरोप आहे. मी चांभार आहे आणि राऊत हे ओबीसी आहेत. ‘चारसो बीस’ याच विधानाचा दाखला देत राऊतांकडून माझी बदनामी झाल्याचा आरोप राणा यांनी केला आहे.
मी चांभार जातीची असल्याने शिवसेना आणि त्यांचे कार्यकर्ते मला त्रास देत आहेत. असा गंभीर आरोपही नवनीत राणा यांनी केला. राऊत यांच्यावर अॅट्रोसिटी दाखल करा अशी मागणीही नवनीत राणा यांनी केली आहे. त्यामुळेच संजय राऊत यांची कोंडी होण्याची शक्यता आहे.
नवनीत राणा आणि रवी राणा यांना खार पोलिसाकडून अटक करण्यात आली होती. सुरुवातीला राणा दाम्पत्याने अटक करण्यास नकार दिला. मात्र पोलीस या दोघांनाही ठाण्यात घेऊन आले. त्यानंतर राणा दाम्पत्याकडून मुख्यमंत्री आणि आणि राऊत यांच्याविरोधात खार पोलीस ठाण्यात क्रॉस केस केली गेली आहे. तसेच काही शिवसैनिकांविरोधात तक्रार केली आहे.
दरम्यान संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यावर सडकून टीका केली. त्यांच्या जात प्रमाणपत्राचा उल्लेख करत ते खोटारडे आहेत, असे संजय राऊत म्हणाले होते. तर ‘राणा दाम्पत्य ४२० आहेत असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे,’ असा दावा नवनीत राणा यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :


