Ashok Saraf | मुंबई: मराठी सिनेसृष्टी मध्ये अनेक चित्रपट आणि त्याचबरोबर नाटक प्रदर्शित होत असतात. ‘व्हॅक्युम क्लिनर’ (Vacuum Cleaner) हे मराठी नाटक सृष्टीतील एक लोकप्रिय नाटक आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचं कलेसोबत फार जवळचं नातं आहे. राज ठाकरे नेहमी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट द्वारे कलाकारांचे कौतुक करताना दिसत असतात.
दरम्यान, राज ठाकरे यांनी मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ व अभिनेत्री निर्मिती सावंत यांचे व्हॅक्युम क्लिनर हे नाटक पहिले आहे. हे नाटक पाहिल्यानंतर राज ठाकरे यांनी नाटकाचे कौतुक करत त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वर एक पोस्ट शेअर केली आहे.
राज ठाकरे यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंट वरून या नाटकाच्या कौतुकाबरोबरच नाटकातील कलाकारांसोबत आपले फोटो शेअर केले आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये राज ठाकरे मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचे विशेष कौतुक केले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची फेसबुक पोस्ट –
“नुकतंच मी अशोक सराफ आणि निर्मिती सावंत ह्यांचं ‘व्हॅक्युम क्लिनर’ हे नाटक पाहिलं. व्हॅक्युम क्लिनरच्या ‘धक्क्याने’ नात्यांमध्ये निर्माण झालेले ताण दूर होतात हे पाहताना मजा आलीच. पण वयाची ७५ पूर्ण केलेल्या अशोक सराफ ह्यांची ऊर्जा आणि रंगमंचावरचा वावर पाहून थक्क व्हायला झालं. निर्मिती सावंत यांचा बहारदार अभिनय आणि संचातील इतर सगळ्याच कलाकारांचा अभिनय मस्त होता. ह्या नाटकाचे लेखक-दिग्दर्शक-कलाकार, तंत्रज्ञ ह्या सगळ्यांचंच मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा देखील,” असे राज ठाकरे म्हणाले.


