🕒 1 min read
आकाश भडसावळे – संध्याकाळची वेळ होती. बालगंधर्व आवराआवर करीत होते. त्यांनी भरजरी शालू परिधान केला होता. एका विशेष कार्यक्रमाला निघाले असावेत. मात्र गंधर्वांनी या पूर्वी नाटकाच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही वेळी साडी कधीच नेसली नव्हती. गंधर्व पुरुष होते आणि विवाह होऊन त्यांच्या पदरात मुली होत्या. बरं मुलीही आता मोठ्या होत होत्या. मग अचानकच त्यांच्या मनांत काय हे खूळ यावं? काहीच कळत नव्हतं.
गंधर्वांनी आधीच सांगितल्याप्रमाणे टांगेवाला दारात उभा होता. त्यांनी वरूनच त्याच्याकडे डोकावून पाहिलं. हालचाली वाढू लागल्या. गळ्यावर, कानांवर, नाकावर, केसांवर, हातात स्त्रीप्रधान शृंगार साज चढत होता; आणि इतक्यात पटापट पावलं टाकीत बालगंधर्व खाली आले आणि घरात कुणालाही न सांगता टांग्यात बसले. एकटी बाई टांग्याने प्रवास करते आहे म्हटल्यावर टांगेवल्याने दाराकडे पाहिले; आणखी कुणी येतंय का म्हणून! पण ‘चला लवकर… घाई आहे’ असा बायकी आवाज आल्यावर त्याने टांगा हाकला आणि आधीच सांगून ठेवल्याप्रमाणे पुण्यातील गजबजाट आणि गोंधळ असलेल्या वस्तीतील एका मंदिराबाहेर उभा केला.
मंदिरात सर्व जातींच्या महिलांचा हळदी-कुंकू समारंभ होता. बऱ्याच महिला जमल्या होत्या. बालगंधर्व तसे संकोची वृत्तीचे. पण आता तर संकोच मुखावर अजिबातच दिसत नव्हता. ते थेट आत शिरले. स्वतःच्या हातांनी त्यांनी मंदिरातील स्त्रियांना हळदी-कुंकू लावले. इतर स्त्रियांकडून सुद्धा हळदी-कुंकवाचा स्वीकार केला. बालगंधर्वांकडे पाहून बायका एकमेकींच्या कानात काहीतरी कुजबुजत होत्या. गंधर्व ते सगळं पहात होते. त्यांच्या मुखावर एक निर्मळ हसू उमटले.
बायका एकमेकींच्या कानात नेमकं काय बरं म्हणत होत्या? ही आलेली व्यक्ती बालगंधर्व आहे हे त्यांना कळलं असावं का? अहं! ते शक्यच नव्हतं. मग कुजबुज कसली होती? बालगंधर्वांनी नेसलेला उंची शालू त्यांच्या श्रीमंती थाटाचं प्रदर्शन करीत होता. अंगावरील दागिने मुळातच असलेल्या त्या लोभस आणि देखण्या मुखचंद्रिकेला शोभून दिसत होते. बायका आपल्या स्वभावाप्रमाणे पुण्यात आलेल्या या नवीन बाईचे सौंदर्य आणि श्रीमंती यावर चर्चा करण्यात रंगल्या होत्या. बालगंधर्वांना त्यांच्या चर्चेत जराही स्वारस्य नव्हते; मात्र तरीही त्यांनी हसून खेळून एखादा क्षण त्यांच्याशी बोलण्यात घालवला. आपल्या आवाजावरूनही स्त्रियांना आपण पुरुष आहोत हे न कळल्याने गंधर्व मनोमन सुखावले आणि तडक तिथून बाहेर पडून टांग्यात बसले. टांगा दूर जाईपर्यंत मंदिरातील स्त्रिया या नारायणाच्या दर्शनात मग्न झाल्या होत्या. टांगा पाहता पाहता अदृश्य झाला.
दुसऱ्या दिवशी पुण्यात वाऱ्यासारखी बातमी पसरली की, ‘चक्क बालगंधर्व हळदीकुंकू घ्यायला आले’. बायका म्हणू लागल्या, अहो या, या बोटाने मी स्वतः हळदीकुंकू लावलं हो गंधर्वांना. काय ते रूप! आहाहाहा… कुणी म्हणे, नाहीतर काय? एका राणीचा थाट होता बाई त्यांचा. मी तर बाई लगेच ओळखले हो, की हेच ते बालगंधर्व!
आता वर जी लिहिली आहे, ती बालगंधर्वांच्या विषयी असलेली एक रचित कहाणी… एक आख्यायिका! पण बालगंधर्व नावाची जादूच त्या काळात अशी होती की सामान्यातल्या सामान्य व्यक्तीलाही त्यांची मोहिनी पडल्याशिवाय राहिली नाही. मात्र मोहिनी पडावी असं काय होतं त्यांच्याकडे?
लवकरच बालगंधर्वांच्या जीवनावरील नाटक ‘संगीत बालगंधर्व’ रसिकांच्या भेटीला येत आहे. सुबोध भावे यांच्या बालगंधर्व या यशस्वी चित्रपटानंतर नाटकात नेमकं काय असेल याची उत्सुकता अनेकांना असणं स्वाभाविक आहे. तेव्हा नाटक पाहिल्यावरच गंधर्वांची ‘मोहिनी’ आपल्याला दिसून येईल.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1192383844797669376?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1192383503083552769?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
