🕒 1 min read
पुणे : आज संतांचा बुरखा पांघरलेले लोक समाजात धर्माबद्दल द्वेष निर्माण करीत आहेत. सत्तेसाठी आणि धर्मा-धर्मात द्वेष निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराजांचा वापर केला जात आहे. आमचे महापुरूष इतके स्वस्त नाहीत. शिवाजी महाराजांचा वापर सत्तेसाठी किंवा एका धर्मासाठी होत असेल तर त्यांनी सुरतवर स्वारी करताना मंदीर, मशिद आणि चर्च यांचे संरक्षण केले आहे. हे छत्रपतींचे धर्मनिरपेक्ष राज्य आहे आणि त्याला तडा जाऊ दयायचा नसेल तर तरुणांनी पुढे यायला पाहिजे. आजचा तरुण वैचारिकदृष्ट्या समर्थ झाला तर भारत सक्षम बनेल, असे मत व्याख्याते प्रा. अमोल मिटकरी यांनी व्यक्त केले.
न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटच्या डॉ.सुधाकरराव जाधवर सोशल आणि एज्युकेशनल ट्रस्टतर्फे पाचव्या युवा संसदेच्या चौथ्या सत्रात ते बोलत होते. यावेळी आबासाहेब पाटील, व्याख्याते प्रशांत देशमुख, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष व युवा संसदेचे अध्यक्ष शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर आदी उपस्थित होते. सक्षम युवा- समर्थ भारत विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
प्रशांत देशमुख म्हणाले, गाडीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावून स्वराज्य निर्माण होणार नाही. जर तुम्हाला छत्रपतींचे स्वराज्य निर्माण करायचे असेल तर शिवचरित्रातील एका तरी विचाराची तुमच्या जीवनात अंमलबजावणी करा. रायगडावर जाताना फक्त पर्यटन स्थळ किंवा ऐतिहासिक ठेवा म्हणून जाऊ नका तर मनात महाराजांबद्दल आदर घेवून जा आणि गडावरून उतरताना त्यांच्या चरित्राची उर्जा घेवून या. शिवचरित्रातून जगण्याचा संघर्ष आणि प्रेरणा तरुणांनी घेतली पाहिजे, असे ही त्यांनी सांगितले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
