मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे गट व भाजप यांनी एकत्र येत सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा रंगली. फडणवीस यांना नाईलाजाने पक्षश्रेष्ठींचे आदेश मानावे लागले असेही म्हटले जात होते. मात्र या सगळ्यांमध्ये आता शिंदे-भाजप सरकार चांगलेच रंगात आलेले पाहायला मिळत आहे. या सरकारने दोन दिवसीय विशेष अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विधानसभा अध्यक्ष पदही काबीज केले. विधानसभा अध्यक्षपदी भाजपचे राहुल नार्वेकर यांची निवड झाली. त्यानंतर आज या सरकारने यशस्वीरित्या बहुमतही सिद्ध करत बाजी मारली. त्यामुळे आता राज्यात शिंदे-भाजप सरकार किती काळ टिकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
दरम्यान सभागृहातील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची तर नावे सर्वांना समजली. मात्र, विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी महाविकास आघाडीतून कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यासाठी राष्ट्रवादीतील जयंत पाटील तसेच अजित पवार व इतर काही नेत्यांची नावे समोर आली होती. मात्र आता विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड झाली आहे.
अजित पवार यांनी सत्तेत असताना उपमुख्यमंत्री, ऊर्जामंत्री, अर्थमंत्री अशी महत्वाची खाती सांभाळली आहेत. अजित पवार यांनी ही खाती केवळ सांभाळली नाही तर त्या खात्याचा मंत्री म्हणून आपल्या काळात वेगळी छापही पाडली आहे. अशा अजित पवार यांची आज विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस यापूर्वी विरोधी बाकांवर बसली, मात्र विरोधी पक्षनेते पद अजित पवार यांनी याअगोदर कधी भूषविलेला नाही. त्यामुळे हे पद सांभाळताना अजित पवारांची चांगलीच कसोटी लागणार आहे.
विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड झाल्यानंतर अनेक नेत्यांची अभिनंदनपर भाषणे झाली. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अजित पवारांबद्दल बोलताना त्यांच्या कामाचे कौतुक केले. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अजित पवारांना विरोधी पक्षनेते पदाच्या शुभेच्छा दिल्या. फडणवीस म्हणाले की, अजित पवारांची प्रेमाची दादागिरी चालते. त्यांनी मांडलेला शब्द कधीच मोडला जात नाही. राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे जरी स्थिर असली तरी अजित पवार हे मात्र त्यांचे काम वक्तशीरपणेच करतात.’अशा शब्दात फडणवीस यांनी अजित पवार यांचे कौतुक केले.
महत्वाच्या बातम्या :


