मुंबई : महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल राठोड यांचे बुधवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राठोड यांना आठ दिवसापूर्वी एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना न्युमोनियाची लागण झाल्याचे सांगण्यात आले होते.
न्युमोनियातून ते बरे होत होते. मंगळवारी संध्याकाळी त्यांना बरे वाटत होते, आणि त्यांनी हलका आहारही घ्यायला सुरुवात केली होती.मात्र बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
दीर्घकाळ त्यांनी विधानसभेत नगर शहराचे प्रतिनिधित्व केले. नगर शहराला शिवसेनेचा बालेकिल्ला बनवण्यात त्यांनी सिंहाचे योगदान दिले होते.शहराच्या राजकारणावर प्रचंड दबदबा असलेल्या राठोड यांची नगर जिल्ह्यातील शिवसेनेचा चेहरा अशी ओळख होती.त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याची माहिती कळल्यावर स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनी करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. अनिल राठोड यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, एक मुलगी व मुलगा विक्रम राठोड असा परिवार आहे. अनिल राठोड यांच्यावर सकाळी दहा वाजता अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
माजी राज्यमंत्री, शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांचे निधन झाल्याचे समजून धक्का बसला. त्यांच्या निधनाने सामाजिक कार्याला वाहून घेतलेलं कर्तृत्ववान नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर, लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ केलेले कार्य सदैव स्मरणात राहील. आम्ही सर्वजण त्यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, ही प्रार्थना. अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
बाबरी मशीद होती, आहे आणि राहील; ओवेसींनी पुन्हा उकरला बाबरी मशिदीचा मुद्दा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

