टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय गणितं बदलताना दिसत आहेत. तर कॉंग्रेसमधून आमदार गळती होण्याचे सत्र सुरूच आहे. काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार हे भाजपमध्ये जाऊ इच्छित आहेत. पण सिल्लोडच्या भाजप पदाधिकाऱ्यांचा सत्तारांच्या भाजप प्रवेशाला विरोध आहे. त्यामुळे सत्तार यांच्या भाजप प्रवेशाबाबत काही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.तर रावसाहेब दानवे यांनी याबाबत सावध प्रतिक्रिया दिली आहे.
यावर दानवे म्हणाले की, सत्तार यांच्या प्रवेशाबाबत सिल्लोडच्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये काहीशी नाराजी आहे. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतरचं सत्तारांना पक्षात घ्यायचा की नाही, याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान बहुचर्चेत असणारे राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप प्रवेश जवळ पास निश्चित झाला आहे. तर त्यांच्या बरोबर सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार हे देखील भाजपमध्ये जाऊ इच्छित असून अन्य ८ ते १० कॉंग्रेस आमदार देखील कॉंग्रेसला राम राम ठोकण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात आयात होत आहे. मात्र ही आयात भाजप कार्यकर्त्यांना काहीशी रुचेनाशी झाली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
