🕒 1 min read
Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीतील सर्व नेते सत्तारांच्या वक्तव्याचा विरोध करत आहेत. मात्र विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मौन बाळगले आहे. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे. अजित पवार – शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यात मतभेद असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. विरोधी पक्षातीन नेत्यांनी देखील यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
संपूर्ण राज्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक आहे. मात्र अजित पवार नॉट रीचेबल आहेत. अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरले आणि अजित पवारांनी साधे ट्वीट देखील केले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीतील सभेपासून अजित पवार नॉट रीचेबल आहेत.
अजित पवार कधी कोणती भूमिका घेतील याबद्दल काही नेम नाही –
“अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांची बाजू का घेतली नाही. याबद्दल चर्चा सुरु आहे. पण मला वाटते तो भाऊ-बहीणीचा प्रश्न आहे. मात्र अजित पवार कधी कोणती भूमिका घेतील याबद्दल काही नेम नसतो. त्यांच्या भुमिकेचा अंदाज व्यक्त करता येत नाही,” असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
दया कुछ तो गडबड है-
मनसे नेते गजानन काळे म्हणाले, “महाराष्ट्रासमोर इतके प्रश्न आ वासून उभे आहेत. मात्र महाराष्ट्रातील शॉडो मुख्यमंत्री ज्यांना म्हटले जाते ते विरोधी पक्ष नेते अजित पवार काही दिवसापासून शांत असल्याचे आपण बघितले. इतकं की राष्ट्रवादीच्या मंथन शिबिरात तब्येत बरी नसताना शरद पवार उपस्थिती लावतात. मात्र काही वयक्तिक कारण सांगून अजित पवार हे अनुपस्थित होते. दया कुछ तो गडबड है, एवढे मात्र नक्की”, असे गजानन काळे म्हणाले.
“काल परवा अब्दुल सत्तार सारखा एक मंत्री सुप्रिया सुळे यांच्यावर इतक्या गलिच्छ भाषेत, शिवराळ भाषेत बोलतो. संपूर्ण महाराष्ट्रातून त्याचा निषेध केला जातो. मात्र विरोधी पक्ष नेत्याच्या ट्विटर अकाउंटवर सुध्दा याची साधी प्रतिक्रिया दिसत नाही. कुठल्या मीडियाला सुध्दा अजित पवार यांनी निषेध नोंदवला आहे, हे दिसत नाही”, अशी प्रतिक्रिया गजानन काळे यांनी दिली.
यापूर्वी दिल्लीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतून अजित पवार निघून गेले होते. त्यामुळे ते नाराज असल्याची जोरदार चर्चा होती. वक्ता म्हणून जयंत पाटील यांच्या नावाची घोषणा होताच अजित पवार मंचावरून निघून गेले होते. नाराजी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते मात्र यापूर्वी अजित पवारांनी बंडखोर वृत्ती दाखवली आहे.
अजित पवार यांची भूमिका राष्ट्रवादीला तणावात टाकणारी-
अजित पवार मंचावरून उठताच त्यांच्या समर्थकांनीही घोषणाबाजी केली. त्यांच्या या भूमिकेकडे शक्तीप्रदर्शन म्हणून पाहिले जात आहे. नाराज अजित पवारांचे मन वळवण्याची जबाबदारी पुन्हा एकदा त्यांच्या चुलत बहिण सुप्रिया सुळे यांच्यावर देण्यात होती. मात्र आता आता सुप्रिया सुळे यांची बाजू घेताना अजित पवार गप्प आहेत. अजित पवारांची ही भूमिका राष्ट्रवादीला तणावात टाकणारी आहे, कारण त्यांनी यापूर्वी बंडखोरी करून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथही घेतली होती. दोघांनीही सकाळीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती, पण 80 तासही सरकार चालू शकले नाही. आजही त्यांचे फडणवीस यांच्याशी चांगले संबंध असल्याचे बोलले जाते.
अजित पवार यांनी बंडखोर वृत्ती दाखवली तर…
शरद पवार यांची पुढील 4 वर्षांसाठी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड झाली आहे. 1999 पासून ते पक्षाचे अध्यक्ष आहेत. सध्या त्यांच्याशिवाय सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल असे दोन सरचिटणीस पक्षाकडे आहेत. एवढेच नाही तर अजित पवार हे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. शरद पवार 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी विरोधी एकजुटीचा पुरस्कार करत आहेत. अशा वेळी अजित पवारांनी बंडखोर वृत्ती दाखवली तर शरद पवारांना त्यांच्याच पक्षात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
राष्ट्रवादीत दोन गट?
राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचे चित्र आहे. हे सकाळच्या शपथविधी दरम्यान दिसून आले होते. पहिल्या गटामध्ये खुद्द शरद पवार आणि त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे आहेत, ज्यांना जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ यांसारख्या तगड्या नेत्यांचा पाठिंबा आहे. याशिवाय अजित पवारांचा आणखी एक गट असून त्यात धनंजय मुंडे, सुनील तटकरे असे नेते आहेत. हे नेते तरुण आहेत आणि लोकांमध्येही त्यांचा चांगलाच प्रभाव आहे. वास्तविक शरद पवारांनंतर अजित पवार यांच्यासारखा मास लीडर राष्ट्रवादीत नाही. यामागे त्यांची कार्य शैली आहे. नेत्यांमध्ये आणि आपल्या भागातील लोकांमध्ये राहणाऱ्या नेत्यांपैकी ते एक आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Politics News | ठाकरे गटाचे आमदार रात्री-बेरात्री मुख्यमंत्र्यांना भेटतात ; मोठ्या खासदाराचा गौप्यस्फोट
- Aditya Thackeray | “आदित्य ठाकरे कोण?, मला माहिती नाहीत”, म्हणणाऱ्या तानाजी सावंताना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…
- DY Chandrachud | वडिलांनंतर मुलगा न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी घेतली ५० वे सरन्यायाधीशपदी शपथ
- Sanjay Raut | संजय राऊतांच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी
- Uddhav Thackeray | “या मंत्र्यांना हाकला, नाहीतर…” – उद्धव ठाकरे सत्तारांवर कडाडले

