🕒 1 min read
मुंबई: भाजपचे लोक पायाखाली चिरडलेल्या मुंगीच्या बाबतीतही शोक संवेदना व्यक्त करून ठाकरे सरकारला जाब विचारतात, पण प्रभाकर साईलच्या संशयास्पद मृत्यूमुळे त्यांना साधी हळहळ वाटू नये याचे आश्चर्य वाटते. एनसीबीचे अधिकारी ज्या भाजप पुढाऱ्यांबरोबर त्या काळात ऊठबस करीत होते, त्यांनी प्रभाकर साईलच्या मृत्यूबाबत समाजमाध्यमांवर व्यक्त केलेल्या भावना रहस्यमय तितक्याच संशयास्पद आहेत. प्रभाकर साईलचा मृत्यू रहस्यमय आहे या संशयास त्यामुळे बळकटीच मिळते. प्रभाकरचे काय झाले? त्याचा मनसुख हिरेन झाला काय असे प्रश्न भाजपच्याच गोटातून निर्माण व्हावेत. त्यामुळे संशयाचा भोवरा जिथे फिरायचा त्याच दिशेने फिरताना दिसत आहे. धाडसाने जे सत्य बोलत आहेत ते एकतर तुरुंगात ढकलले जात आहेत किंवा प्रभाकर साईलप्रमाणे संशयास्पदरीत्या मरण पत्करत आहेत. असा घणाघात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखातून केला आहे.
महाराष्ट्राच्या गृहखात्याने हे आव्हान स्वीकारायला हवे असे म्हणत संजय राऊत यांनी म्हटले की, मारुती कांबळेचे काय झाले? या प्रश्नाप्रमाणेच प्रभाकर साईलचे काय झाले? तो का मेला? असे प्रश्न सर्वांना पडले आहेत. दोन दिवसांपूर्वी नागपुरातून अॅड. सतीश उके यांना ‘ईडी’ने एका जमीन घोटाळा प्रकरणात अटक केली. जमीन घोटाळा हे निमित्त आहे अॅड . उके यांच्या अटकेचे कारण राजकीय दहशत निर्माण करणे हेच आहे. अॅड . सतीश उके यांनी गंभीर अपराध, आर्थिक किंवा जमीन घोटाळे केले हे मान्य केले तरी ईडीने पहाटे घुसून त्यांना जेरबंद करण्यासाठी मनी लॉण्डरिंग, हवाला , स्मगलिंगसारखी ती प्रकरणे नव्हती . महाराष्ट्राचे पोलीस अशा प्रकरणांचा तपास करून गुन्हेगारांना शासन करण्यास समर्थ आहेत. पोलीस कमी पडले असते तर विरोधी पक्षाने त्या विरोधात आवाज उठविला असता, पण सतीश उके यांना ‘ईडी’ने ताब्यात घेतले व तुरुंगात डांबले. सतीश उके यांनाही आपल्या जिवाची भीती वाटत आहे. त्यामुळे गृहमंत्री वळसे-पाटील यांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहायलाच हवे. अशी मागणी संजय राऊत (sanjay raut) यांनी केली आहे.
सतीश उके यांना जेरबंद केल्यावर प्रभाकर साईलचा आवाज कायमचा बंद केला आहे. प्रभाकर साईल कोण, हे एव्हाना लोकांच्या लक्षात आलेच असेल. शाहरुख खानचा पुत्र आर्यन खान याचे कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरण गाजले होते. आर्यनला ड्रग्ज प्रकरणात सरळ सरळ फसविण्यात आले. आर्यनकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत, त्याने ड्रग्जचे सेवन केले नाही. तरीही एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी आर्यनला अटक करून सनसनाटी निर्माण केली. याच प्रकरणात खंडणी मागण्याचाही प्रकार घडला. आर्यनला कसे फसवले, एनसीबीचे अधिकारी धनिकांना खोट्या प्रकरणांत कसे अडकवत आहेत याचा पर्दाफाश प्रभाकर साईल याने केला. प्रभाकर साईल हा असा एक साक्षीदार ठरला की , त्याने एनसीबी अधिकाऱ्यांचे रॅकेट उद्ध्वस्त करून देशात खळबळ माजवली. समीर वानखेडेंचा मुखवटाच या प्रभाकरमुळे फाटला. राष्ट्रवादीचे नेते व मंत्री नवाब मलिक यांनी क्रूझ ड्रग्ज प्रकरण कसे बोगस आहे हे टप्प्याटप्प्याने पुराव्यांसह बाहेर काढले. त्यातला एक महत्त्वाचा साक्षीदार प्रभाकर साईल होता. प्रभाकरमुळे केंद्रीय तपास यंत्रणांचा बनावटपणा समोर आला.
आता अचानक प्रभाकर साईलचा मृत्यू झाला. हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले गेले, पण मृत्यू संशयास्पद आहे असे खुद्द गृहमंत्री वळसे – पाटील यांनाच वाटत आहे व त्यांनी पोलीस महासंचालकांना चौकशीचे आदेश दिले आहेत. या सर्व प्रकरणातला खोटारडेपणा उघड करणारे मंत्री नवाब मलिक यांना ‘ईडी’ने आधीच तुरुंगात डांबले आहे. आता पंच प्रभाकर साईलचा मृत्यू झाला. प्रभाकर हा क्रूझ ड्रग्ज प्रकरणातला प्रत्यक्ष साक्षीदार होता. भारतीय जनता पक्षाचा अजेंडा चालविणाऱ्या एका अधिकाऱ्याच्या विरोधात प्रभाकर साईल निर्भयपणे उभा राहिला व शेवटपर्यंत तो सत्य बोलत राहिला. केंद्रीय तपास यंत्रणांचा खेळ त्याच्या साक्षीने कोलमडून पडला. मोदी यांनीच पंतप्रधान म्हणून प्रभाकरच्या मृत्यूकडे गांभीर्याने पाहायला हवे. अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
खताचे संकट टाळण्यासाठी कृषी विभागाचा पुढाकार!
IPL 2022 CSK vs PBKS : कशी नशिबानं थट्टा आज मांडली..! चेन्नई सुपर किंग्जच्या पराभवाची हॅट्ट्रिक
IPL 2O22 : RCBमधून एक खेळाडू स्पर्धेबाहेर; ‘या’ खतरनाक खेळाडूला मिळाली संघात एन्ट्री!
IPL 2022 CSK vs PBKS : लिव्हिंगस्टोनची वादळी खेळी; पंजाबचं चेन्नईला १८१ धावांचं आव्हान!
IPL 2O22 : जोस बटलरनं ठोकलं शतक; क्रेडिट कोणाला दिलं माहितीये? वाचून हसाल!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
