औरंगाबाद: हिमायत बागेत मंगळवारी (दि.४) निसर्गप्रेमींनी ‘हिमायत बाग बचाव’ संबंधी बैठक पार पडली. यावेळी हिमायत बागेतील वृक्षतोड न थांबविल्यास २६ जानेवारीला उपोषण करू. असा ईशारा निसर्गप्रेमींनी यावेळी दिला आहे. शहरातील प्रमुख ऑक्सिजन हब असलेल्या शंभर एकरवर पसरलेल्या या हिमायत बागेत अवैध गुरेचराई, नशेबाज लोकांचा मुक्त वावर, उपद्रवी लोकांचा दिवसभर संचार असतो. निसर्गप्रेमी संजय बनसोड यांनी वृक्षतोड न थांबल्यास आत्मदहनाचा इशारा दिला आहे. या बैठकीसाठी शहरातील निसर्गप्रेमी, पक्षीमित्र, मॉर्निंग वॉक ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.
मागील काही दिवसात हिमायतबागेत वाळलेल्या फांद्यांच्या नावाखाली जुन्या कवठ, चिंच, आंबा या झाडांची कत्तल केली गेली. या ठिकाणी काही झाडांचे वयोमान हे दोनशे ते तीनशे वर्षांचे आहे. या ठिकाणी चिंच, आंबा,पेरू, आवळा, कवठ, जांभूळ याच्या फळबागा आहेत. परभणी कृषी विद्यापीठ अंतर्गत असणाऱ्या या हिमायत बागेची काही वर्षात दुर्दशा झालेली आहे. गेल्या काही दिवसात फळबागांना कुंपण करण्यासाठी हिमायतबाग परिसरातील काटेरी झाडेझुडपे त्यांची कत्तल केली जात असून या झुडपांमध्ये असलेली मोर, तीतर, लावरी या पक्ष्यांची घरटी उध्वस्त केली जात आहेत.
अडीचशे पेक्षा जास्त मोर एकेकाळी असलेल्या बागेत आता २५ मोर उरले आहेत. कारण मोरांना अंडी घालण्यासाठी झुडपी जंगल आवश्यक असते ते नष्ट झालेले आहे. या बागेत दिवसभर फिरणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि ठराविक अशी कुठली वेळ नाही त्यामुळे मोर व इतर पक्षी बिचकत आहेत. बागेत १८२ प्रकारचे पक्षी ज्यात स्थानिक व स्थलांतरित पक्षी दिसून येतात त्यांची संख्या खूप कमी झालेली आहे. याशिवाय इथे ४५ प्रकारची फुलपाखरे शेकडो प्रकारचे पतंग, इतर कीटक, दहा प्रकारचे साप, दहा हजारांपेक्षा जास्त वृक्ष वेल आहेत. जे आज संकटात आहेत.
झाडांची होत असलेली कत्तल याविरोधात शेकडो निसर्गप्रेमी बागेत जमले. याप्रसंगी मानद वन्यजीव रक्षक डॉ. किशोर पाठक यांनी हिमायत बागेतल्या जैवविविधतेची माहिती दिली आणि ती वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रशासनाविरुद्ध लढण्याचे आवाहन केले आहे. अॅड. स्वप्नील जोशी यांनी हिमायत बागेचे ऐतिहासिक महत्त्व व त्यांनी मागील काही वर्षात हिमायत बागेवर केलेल्या अभ्यासाचे विवेचन केले. यानंतर निसर्गप्रेमींनी हिमायत बागेचे प्रशासकीय अधिकारी एम. बी. पाटील यांना वृक्षतोड विरुद्ध तसेच बागेचे संरक्षण करण्यासाठी निवेदन दिले. आणि बागेतली वृक्षतोड न थांबल्यास २६ जानेवारी रोजी अमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सिंधुताई यांच्याशी खास नातं..’ म्हणत पडद्यावर सिंधुताई सपकाळ साकारणारी तेजस्विनी पंडित झाली भावूक
- विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर कोरोना पॉझिटिव्ह; ट्वीट करत दिली माहिती
- बाईकवर किस करणाऱ्या ‘त्या’ तरुणाला अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- “नकली घोड्यावर बसणाऱ्या ‘मैने’ला पद्म पुरस्कार दिला जातो पण…”, रोहित पवारांचा कंगनाला अप्रत्यक्ष टोला
- “सध्याच्या महाराष्ट्राला कोणी वालीआहे का?”, सदाभाऊंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
