Share

“विरोधी पक्ष मांजरीचा वंशज असल्याने…” ; शिवसेनेची खोचक टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: एकेकाळी महाराष्ट्रातील विरोधी पक्ष हा वाघासारखा डरकाळ्या फोडीत होता व सिंहासारख्या गर्जना करीत होता. विरोधी पक्ष हा सरकारइतकेच महत्त्वाचे कार्य करीत असे, पण आजचा विरोधी पक्ष विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून ‘मांजरचेष्टा’ करतो. डरकाळ्यांच्या जागी मांजरीचे आवाज काढून स्वतःचे हसे करून घेतो. विरोधी पक्षाची अवस्था आज शरीर मांजराचे व काळीज उंदराचे अशीच झाली आहे. माणसाच्या चित्रविचित्र चाळ्यांना आपल्याकडे ‘माकडचेष्टा’ म्हटले जाते. कारण माणूस माकडाचा वंशज आहे. राज्यातील आजचा विरोधी पक्ष मात्र मांजरीचा वंशज असल्याने तो जे काही उलटसुलट करीत आहे त्या ‘मांजरचेष्टा’च ठरत आहेत. अशी खोचक टीका शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखात केली आहे.हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षनेते नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यासह इतर नेत्यांनी ‘म्याव..म्याव’ आवाज काढत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता. त्याचे राजकारण रंगत असतानाच आता संजय राऊत यांनी यांनी थेट विरोधी पक्षाला मांजरीचा वंशज म्हटले आहे.

महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. पण ते राज्यघटनेनुसार चालू दिले जात आहे काय? घटनेनुसार ज्यांनी राज्य चालवायचे ते आपले सन्माननीय राज्यपालच राज्यात घटनात्मक कोंडी करताना दिसत आहेत. ही कोंडी भारतीय जनता पक्षाच्या सोयीसाठी केली जात असेल तर तो सरळ सरळ राजकीय हस्तक्षेप आहे. महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून जे रामायण, महाभारत घडवले गेले व त्याद्वारे शेवटपर्यंत विधानसभेला अध्यक्षच लाभू दिला गेला नाही, याची जबाबदारी शेवटी कोण घेणार? राज्यपाल घटनाबाह्य पद्धतीने वर्तन करतात व त्यांच्याशी संघर्ष केला की भाजपचे पुढारी राज्यात राष्ट्रपती शासन लावण्याची भाषा करणार, याला आता जनता विटली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यात आली असून राजभवनात बसून आपणच राजशकट हाकत असल्याचे स्वप्न भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख मंडळींना पडले आहे. दोन वर्षापासून या मंडळींची झोप उडाली असताना जागेपणी त्यांना स्वप्ने पडतात. याचाच अर्थ त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची भाषा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) आठवड्यात दोनदा केली आहे. राष्ट्रपती राजवट लावण्याबाबतची सर्व कारणे ठाकरे सरकारने पूर्ण केल्याचे पाटील सांगतात. त्याच्या दुसऱ्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरून राज्यपालांना विश्वासात घेतले नसल्याच्या कारणाने राष्ट्रपती राजवट लागू शकते, असे वक्तव्य भाजपच्या प्रांताध्यक्षांनी करावे हे आश्चर्यच आहे. सरकार त्या कारणाने बरखास्त होऊ शकते असे पाटील म्हणतात हे त्यांचे अज्ञान आहे. अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.

महाराष्ट्रात ठाकरे सरकारला १७० आमदारांचा पाठिंबा असताना त्या बहुमताचा अनादर करायचा व सरकार बरखास्तीचे तुणतुणे वाजवायचे ही कसली तरहा? महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षांची निवड कोणत्या मतदान पद्धतीने करावी? ती डोकी मोजून करायची की, आवाजी मतदानाने करायची? हा विधानसभेचा अधिकार. सरकारने या प्रक्रियेबाबत राज्यपालांना कळवायचे असते व घटनेनुसार राज्यपालांनी ‘मम’ म्हणायचे असते. पण १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपाल वर्षभर अभ्यास करीत बसले आहेत. तसे त्यांनी विधानसभा अध्यक्ष निवडीबाबतही केले. प्रत्येक वेळी बहुमताचा, लोकप्रिय सरकारचा अनादर करायचा, सरकारची कोंडी करायची व पायात पाय अडकवायचा हे घटनाविरोधी आहे. महाराष्ट्राच्या भाजप पुढाऱ्यांनी या घटनाबाह्य कृतीचे समर्थन हे चांगल्या, निरोगी राजकीय प्रकृतीचे लक्षण नाही. मदांध हत्तीप्रमाणे लोक वागत आहेत, असे म्हणावे तर त्यांना गजराजाची उपमाही देता येत नाही, पण नक्कीच हे लोक मदांध झाले आहेत व सत्ता येत नाही, सरकार पडत नाही या तणावाने त्यांच्या डोक्याचा ‘केमिकल लोचा’ झाला आहे. ते काय बोलतात, काय करतात याचे ताळतंत्र राहिलेले नाही. एकेकाळी महाराष्ट्रातील विरोधी पक्ष हा वाघासारखा डरकाळ्या फोडीत होता व सिंहासारख्या गर्जना करीत होता. संयुक्त महाराष्ट्र लढय़ापासून वेळगावच्या लढय़ापर्यंत विरोधी पक्षाचे नेतेच महाराष्ट्राच्या जनतेचा आवाज बनून लढे देत होते. महाराष्ट्राच्या पक्षाला एक महान परंपरा लाभली आहे. विरोधी पक्षनेत्यांच्या भाषणांना सभागृह सर्व गॅलऱ्या गच्च वाहत असत. पक्ष हा सरकारइतकेच महत्त्वाचे कार्य करीत असे, पण आजचा विरोधी पक्ष विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून ‘मांजरचेष्टा करतो. डरकाळ्यांच्या जागी मांजरीचे आवाज काढून स्वत:चे हसे करून घेतो. विरोधी पक्षाची अवस्था आज शरीर मांजराचे काळीज उंदराचे अशीच झाली आहे. माणसाच्या चित्रविचित्र चाळ्यांना आपल्याकडे ‘माकडचेष्टा’ म्हटले जाते. कारण माणूस माकडाचा वंशज आहे. राज्यातील आजचा विरोधी पक्ष मात्र मांजरीचा वंशज असल्याने तो जे काही उलटसुलट करीत आहे त्या ‘मांजरचेष्टा’च ठरत आहेत. विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कधीकाळी अभ्यासपूर्ण भाषणांसाठी प्रख्यात होते. आज ते खोटया गोष्टींसाठी त्यांची प्रतिष्ठा धुळीस मिळवीत असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

जयंत पाटील यांना जे ओळखतात त्यांना खात्रीने सांगता येईल की, कुणाला इजा करणे, कुणावर हल्ला घडवून आणणे अशी अचाट कामे करण्याची वृत्ती वाळव्याच्या पाटलांची नाही. पण भाजपचे एक आमदार पडळकर यांनी पाटलांनी आपल्यावर कसे मारेकरी घातले व आपण त्यातून कसे बचावलो याचे रसभरीत वर्णन केले व विरोधी पक्षनेते फडणवीसांनी त्यावरून सरकारवर हल्ले केले विरोधी पक्षनेतेपदाची प्रतिष्ठा अशामळे कमी होत असते याचे भान तरी माजी मुख्यमंत्र्यांनी ठेवायला नको काय? असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.

आता या बनावट, फुसक्या प्रकरणांचा आधार घेऊन भाजपवाले महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावणार आहेत काय? विरोधी पक्षनेत्यांनी पडळकरांवरील हल्ल्याबाबत सभागृह डोक्यावर घेतले, सिंधुदुर्गात संतोष परब या शिवसैनिकावर निर्घृण असा खुनी हल्ला झाला. भारतीय जनता पक्षाच्या उपन्या लोकांनी संतोष परब यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. फडणवीस यांनी परब यांच्यावरील हल्ल्यावर प्रश्न का उपस्थित केला नाही? सिंधुदुर्गात गेल्या तीसेक वर्षात अनेक राजकीय हत्या करण्यात आल्या व पचवून ढेकर देण्यात आले. राजकीय वरदहस्ताशिवाय ते शक्य नाही. श्रीधर नाईकापासून रमेश गोवेकरांपर्यंत ज्या हत्या झाल्या त्याच मालिकेत संतोष परबांनाही बसवायचे होते, पण परबांचे दैव बलवत्तर म्हणून ते बचावले. पडळकर यांचे प्राण मोलाचे व संतोष परब यांचे मातीमोलाचे असे विरोधी पक्षनेत्यांना वाटत असेल तर ते योग्य नाही. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी या हल्ल्याकडे गांभीर्याने पहायला हवे व त्याचा तटस्थ अहवाल केंद्राकडे पाठवायलाच हवा. लखीमपूर खिरीतले केंद्रीय मंत्रीपुत्राचे प्रताप आणि कोकणातले हत्या व हल्ल्याचे प्रताप यात साम्य आहे. मदांध हत्तीप्रमाणे उधळलेल्या या लोकांना वेसण घालण्याची जबाबदारी ठाकरे सरकारची आहे. ठाकरे सरकार बरखास्त करावे हे भाजप नेत्यांचे डाव आहेत. माजरांनी म्याव म्याव न करता शेपट्या घातल्याची ही साक्ष आहे. कायद्याचे राज्य बेकायदेशीरपणे बरखास्त करता येणार नाही याची खूणगाठ मनाशी बांधा व शांत बसा! असा इशाराही संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!