🕒 1 min read
नवी दिल्ली : काल(१५ नोव्हें.)रात्री पत्रकार परिषदेत बोलत असतांना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यांच्या भांडवली खर्चात वाढ व्हावी व पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती मिळावी, यासाठी केंद्र सरकार आठ दिवसांमध्ये ९५ हजार ८२ कोटी रुपयांचा निधी राज्यांना उपलब्ध करून देईल,’ अशी माहिती दिली.
सोमवारी कोरोना राज्यांच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी सीतारामन यांनी दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीत १५ राज्यांचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री सहभागी झाले होते. राज्यांच्या आर्थिक विकासाला गती मिळावी, यासाठी भांडवली खर्चात वाढ करण्याची गरज असल्याने राज्यांना आगाऊ निधी दिला जावा, अशी विनंती अनेक राज्यांनी केली. यानंतर बोलतांना सीतारामन म्हणाल्या की,’केंद्राला मिळणाऱ्या महसुलापैकी ४१ टक्के हिस्सा राज्यांना वितरित केला जातो. नोव्हेंबरमधील ४७ हजार ५४१ कोटींचा हप्ता नियमाप्रमाणे दिला जाईल, त्याशिवाय तितक्याच रकमेचा आणखी एक हप्ताही राज्यांना दिला जाणार आहे. त्यामुळे राज्यांना केंद्राच्या महसुली हिश्श्यातील दोन हप्ते एकत्रित मिळू शकतील. दरवर्षी मार्चमध्ये मिळणाऱ्या तीन हप्त्यांपैकी एक हप्ता नोव्हेंबरमध्ये आगाऊ दिला जाणार आहे.’
दरम्यान, पुढे त्या म्हणाल्या की,’राज्यांच्या मागणीनुसार वस्तू व सेवा कर वसुलीतील नुकसानभरपाईची चालू आर्थिक वर्षांतील संपूर्ण रक्कम देण्यात आली आहे. तशीच महसुली हिश्श्यातील रक्कमही दिली जावी अशी विनंती राज्यांकडून करण्यात येत होती. त्यावर सविस्तर चर्चा केल्यानंतर भांडवली खर्चासाठी राज्यांच्या हाती अधिक रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला, अशीही माहिती सीतारामन यांनी दिली. करोनाच्या कठीण काळात राज्यांच्या महसुलात मोठी घट झाली, हे लक्षात घेऊन ५० वर्षांपर्यंत बिनव्याजी दीर्घकालीन कर्ज एखाद्या अनुदानाप्रमाणे दिले गेले होते, त्याचा राज्यांना लाभ मिळाला असून, ही तरतूद कायम ठेवण्याची विनंती राज्यांनी केली. आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी राज्या-राज्यांच्या वेगवेगळ्या गरजा असल्याने त्यांनी स्वतंत्रपणे लेखी सूचना केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे पाठवाव्यात, अशी सूचना सीतारामन यांनी राज्यांच्या अर्थमंत्र्यांना केली. उत्पादन क्षेत्राला गती, पायाभूत सुविधांचा विकास आणि गुंतवणूक वाढ अशा तीन प्रमुख मुद्यांवर बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.’
महत्त्वाच्या बातम्या
- काही राजकीय पक्षांचे घटक त्यांच्यातील नैराश्य…- शरद पवार
- नवाब मलिक यांनी केलेल्या ‘त्या’ आरोपांवर आशिष शेलारांचे प्रत्युत्तर; म्हणाले…
- भाजप नेत्यांचं दंगे घडवण्याचं षडयंत्र, पैसेही वाटले; मलिकांचा खळबळजनक आरोप
- ‘महात्मा ज्योतीराव फुले’ योजनेचा वैजापूरातील ३६ हजार शेतकऱ्यांना लाभ
- आता राष्ट्रवादीही मनपा निवडणुकीच्या रिंगणात, औरंगाबादेत स्वबळाची चाचपणी

