🕒 1 min read
पुणे : जरंडेश्वर साखर कारखान्यावरील कारवाई ही तर सुरुवात आहे, राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून कवडीमोल किंमतीला ताब्यात घेतलेल्या सर्व साखर कारखान्यांची आणि सुतगिरण्यांची चौकशी तपास यंत्रणांच्या रडारवर आहे, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पुण्यात बोलताना दिला.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून वेगवेगळे सहकारी साखर कारखाने तोट्यात दाखवून ते जप्त करायचे. नंतर त्यांचा लिलाव करायचा आणि दोनशे कोटीची संपत्ती पंधरा कोटीत खरेदी करायची. त्यावर पुन्हा तीनशे कोटीचे कर्ज घ्यायचे अशा पद्धतीचा गैरव्यवहार राज्यात झाला आहे. अशा सर्व २४ साखर कारखान्यांची खरेदी सक्तवसुली संचालनालयाच्या अर्थात ईडीच्या रडारवर आहे. जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची संपत्ती ईडीने जप्त केल्यानंतर त्याच्या व्यवहारांची कागदपत्रे उघड झाली आहेत. जरंडेश्वर हे या गैरव्यवहाराच्या बाबतीत हिमनगाचे टोक आहे. यादी मोठी आहे आणि सर्व रडारवर आहेत.
त्यांनी सांगितले की, ‘सहकारी साखर कारखान्यांची शेकडो कोटींची संपत्ती कवडीमोलाने हडपण्याच्या प्रकाराची चौकशी होण्यासाठी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे दाद मागणार आहोत. राजकीय दबावासाठी कारवाई केल्याचा आरोप त्यांनी नाकारला. ते म्हणाले की, कारवाईबद्दल तक्रार करणाऱ्यांनी आधी काही गैरव्यवहार झाला हे तरी मान्य करावे. सध्याच्या काळात चूक करणाऱ्या प्रत्येकाला त्याचे परिणाम भोगावे लागतील.’
आता चंद्रकांत पाटील यांच्या विधानानंतर पुढील नंबर कोणत्या कारखान्याचा आणि यात कोणत्या बड्या नेत्याचा समावेश असेल का ? असे सवाल निर्माण होत आहे. कारण अजित पवार यांच्या निकटवर्तीयांपासून या कारवाईला सुरुवात झाली असल्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘फडणवीस-शाह भेटीचा सरकार पाडण्याशी संबंध नाही’, दानवेंचे स्पष्टीकरण
- मराठा आरक्षण : पुनर्विचार याचिका कोर्टाने फेटाळल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघणार
- ‘जुलाई आ गया है, वैक्सीन नहीं आयीं’, राहुल गांधींचा मोदी सरकारला टोला
- ‘शरद पवारांच्या बदनामीची सुपारी फडणवीसांनी पडळकरांना दिलीये’
- फडणवीसांना केंद्रात बोलावून भाजप स्वतःच्या पायावर कुऱ्हाड का मारून घेईल ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

