🕒 1 min read
उस्मानाबाद: एकीकडे कोरोना महामारी कहर दाखवत असताना दुसरीकडे जिल्ह्याचे राजकारण सुद्धा तापताना दिसत आहे. महाविकास आघाडी सरकारने कोरोना महामारीच्या अभूतपूर्व आपत्कालीन काळात जिल्ह्यातील नागरिकांना वाऱ्यावर सोडून दिले आहे. प्रतिदिन बाधितांची संख्या वाढत आहे. अनेक ठिकाणी रेमडेसिविरचा तुटवडा आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची कमतरता आहे. असे असतानाही काेणीही मंत्री जिल्ह्याकडे फिरकायला तयार नाही. अशा काळातही शिवसेना, राष्ट्रवादीसह काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेते मूग गिळून का गप्प आहेत, असा सवाल भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केला आहे.
जिल्हाभरात २५०० च्या आत चाचण्या होऊनदेखील ६५३ नवीन रुग्ण शनिवारी एका दिवसात सापडले, तर २० कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत उस्मानाबादला अत्यंत कमी प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा केला जात आहे. उमरगा, तुळजापूर, परांडा या उपजिल्हा रुग्णालयांच्या ठिकाणी तर अनेक दिवसांपासून पुरवठाच होत नाही. जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथेही गरजेच्या ५० टक्केही पुरवठा होत नाही. जिल्हा रुग्णालय आवारातील ऑक्सिजन प्लांट काही महिन्यांपूर्वीच पूर्ण होणे अपेक्षित असताना शनिवारी कसेबसे याचे काम पूर्ण झाले. अशा अभूतपूर्व परिस्थितीत राज्य सरकार व राज्य सरकारचा प्रतिनिधी असल्यामुळे पालकमंत्र्यांनी आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडणे गरजेचे असते.
जिल्ह्यात शिवसेनेचे ३ आमदार व १ खासदार जनतेने निवडून दिलेले असताना शिवसेनेच्या सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडून दिल्यामुळे जनता वैतागलेली आहे. या अक्षम्य दुर्लक्षाबाबत उस्मानाबादकर सत्ताधाऱ्यांना कदापि माफ करणार नाहीत. जिल्ह्यातील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना तुम्ही सर्व मूग गिळून गप्प का? असा सवाल उपस्थित करीत या कृतीचा निषेध व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून निषेध नाेंदवावा, असे आवाहन आ. पाटील यांनी केले.
महत्वाच्या बातम्या
- सामना गमावला मात्र, राहुल-मंयकच्या जोडीने तोडला ५ वर्षे जुना विक्रम
- गर्दी कमी झाली नाही तर, कडक लॉकडाऊन करणार : पालकमंत्री अशोक चव्हाण
- नगरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती करा, मुख्यमंत्री ठाकरेंना निवेदन
- वॉर्नर, विल्यमसननं राशिद खानसोबत केला रमजानचा रोजा
- खा.भावना गवळी यांनी घेतला कोरोना परिस्थितीचा आढावा


