🕒 1 min read
मुंबई:- ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना द गॅबा स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने ३ विकेट्सने विजय मिळवत इतिहास रचला आहे. या विजयासह भारताने २-१ ही मालिका जिंकली आहे. भारताचा हा ऑस्ट्रेलियन भूमीतील सलग दुसरा मालिका विजय आहे. याचबरोबर गेल्या ३३ वर्षांचा ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेन कसोटीत अपराजित राहण्याचा विक्रमही भारताने खंडीत केला आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात बॉर्डर गावसकर मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामन्याचा कालचा शेवटचा दिवस होता. कांगारुंनी टीम इंडियाला विजयासाठी 328 धावांचे आव्हान दिले होते. भारताने चौथ्या दिवशी बिनबाद 4 धावा केल्या होत्या.
त्यामुळे पाचव्या दिवशी विजयसाठी आणखी 324 धावांची आवश्यकता होती. सामना रंगतदार स्थितीत होता. मालिका 1-1 ने बरोबरीत होती. भारताला विजयाची संधी होती. यामुळे टीम इंडिया पाचव्या दिवशी कसा खेळ करणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. सर्वच खेळाडूंनी संयमी खेळी केली. सामना ड्रॉ होणार की भारतीय संघ आपल्या खात्यात हा सामना जमा करून ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण करणार, याकडे देशवासियांचं लक्ष होतं.
या युवा संघातील शुभमन गिल, रिषभ पंत यांच्यासह अनुभवी चेतेश्वर पुजाराने केलेल्या खेळीमुळे भारत विजयाच्या जवळ आला. अखेर पंतच्या चौकाराने टीम इंडियाला दणदणीत विजय मिळवून दिला. भारताने कसोटी मालिकेत २-१ असा विजय मिळवत ऑस्ट्रेलियाला लोळवलं आहे.
दरम्यान ऑस्ट्रेलियावरील मालिका विजयामुळे जगभरातील क्रिकेटरसिक, सेलिब्रेटी, नेतेमंडळी भारतीय संघाचं, संघातील खेळाडूंचं आणि कर्णधार अजिंक्य रहाणेचं कौतुक करत आहेत. राज्याचे महसूलमंत्री आणि संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी देखील अजिंक्य रहाणेचं कौतुक केलं आहे. थोरात म्हणाले की, सगळ्या भारतीयांसाठी आणि संगमनेरवासियांसाठी काल आनंदाचा क्षण होता. अजिंक्य रहाणेंच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकणं आणि इतिहास रचणं हे अभूतपूर्व आहे. शेतकरी कुटुंबातील आणि ग्रामीण भागातील तरुणास संधी मिळाल्यास तोदेखील त्याचे नेतृत्वगुण सिद्ध करू शकतो, हे अजिंक्य रहाणे यांनी जगाला दाखवून दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुंबईतील महिला व वकील संघटनांनी दिल्या शक्ती कायद्यासंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना
- कृषी कायद्यांच्या विरोधात ८० वर्षांचा योद्धा उतरणार मैदानात
- मराठा आरक्षणाची आजची सुनावणी स्थगित; पुढील सुनावणी 5 फेब्रुवारी रोजी होणार
- मुलींच्या जुडो कराटे, योगा व जीवन कौशल्य प्रशिक्षणाच्या अनुदानात वाढ
- वाद बाजूला सारून एकदिलाने गावाच्या विकासासाठी निष्पक्षपणे काम करा : आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
