🕒 1 min read
मुंबई- परीक्षांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात चांगलाच कलगीतुरा रंगला असताना आता या वादाने नवे वळण घेतले आहे. आपल्या राजकीय स्वार्थासाठी राज्य सरकारने फक्त अंतिम वर्ष परिक्षांचा घोळ घालून दाखवला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आरोग्य धोक्यात आणले. उलट विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी युजीसीनेच केली. सरकारने ना युजीसीचे सर्क्युलर नीट वाचले, ना कसला अभ्यास केला, ना परिणामांचा विचार केला.. केवळ युवराजांचा हट्ट पुरवला. सगळा कॉपी पेस्ट कारभार सुरू आहे, अशा शब्दांत भाजपा नेते माजी शिक्षणमंत्री आमदार अँड आशिष शेलार यांनी समाचार घेतला आहे.
राज्यातील पदवी अंतिम वर्षे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सतत या विषयाचा पाठपुरावा करुन विद्यार्थ्यांची बाजू मांडणाऱ्या आमदार अँड आशिष शेलार यांनी आज सरकारकडून करण्यात येत असलेल्या दाव्यांचा खोटेपणा उघड केला आहे.
तर दुसरीकडे कोरोना संकटाच्या काळात केंद्र सरकारचे मनुष्यबळ विकास मंत्रालय (एचआरडी) आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत घेतलेला निर्णय हास्यास्पद आहे. जगात कोरोनाचे संकट गंभीर बनले आहे हे माहीत असूनही असा निर्णय घेणे म्हणजे एचआरडी आणि यूजीसी दुसऱ्या विश्वातून आली आहे काय, असे म्हणावे लागेल, अशी टीका राज्याचे पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली.
‘अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत इगो बाजूला ठेवून लाखो विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा विचार करा अशी विनंती आपण यूजीसीला केली आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि यूजीसी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करत नाही याचा अर्थ त्यांना देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याची जाणीवच नाही असे म्हणावे लागेल.’ असे आदित्य ठाकरे म्हणाले.


