पुणे : विधान परिषदेतील राज्यपाल नामनियुक्त आठ सदस्यांची मुदत शनिवारी (ता.६) संपत आहे; तर अन्य दोन सदस्यांची मुदत १५ जूनला संपुष्टात येणार आहे. त्यामुळे विधान परिषदेवरील राज्यपाल नामनियुक्तीसाठी आघाडीत मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राहुल नार्वेकर आणि रामराव वडकुते यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तेव्हापासून राज्यपाल नामनियुक्त दोन जागा रिक्त आहेत.६ जूनला निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये काँग्रेसच्या हुस्नबानू खलिपे, जनार्दन चांदूरकर, आनंदराव पाटील आणि रामहरी रूपनवर यांचा समावेश आहे.
प्रकाश गजभिये, विद्या चव्हाण यांच्यासह विधान परिषदेचे ‘हे’ सदस्य ६ जूनला निवृत्त होणार
या निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकाश गजभिये, विद्या चव्हाण, ख्वाजा बेग आणि जगन्नाथ शिंदे यांचा देखील समावेश आहे. तर १५ जूनला निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये काँग्रेसचे अनंत गाडगीळ आणि रिपब्लिकन पक्षाचे जोगेंद्र कवाडे यांचा समावेश आहे.
राज्यसभा आणि विधान परिषद या वरिष्ठ सभागृहांमध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या अनुभवाचा देश किंवा राज्यांना फायदा व्हावा म्हणून त्यांची नियुक्ती करण्याची घटनेतच तरतूद करण्यात आली. यानुसार राष्ट्रपती राज्यसभेवर तर राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्ती करतात. विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त आमदारांची मुदत येत्या शनिवारी संपुष्टात येत असल्याने नव्या १२ आमदारांची नियुक्ती लवकरच होणार असल्याने राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे.
अर्थात,आमदारकीची माळ गळ्यात पडून घेण्याकरिता अनेक दिग्गज लॉबिंग करताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान आता राष्ट्रवादीकडून संभावित उमेदवारांच्या नावाची चर्चा सुरु झाल्या आहेत. यात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांचही नाव चर्चेत असल्याची माहिती आहे. चाकणकर या गेली १३ वर्ष राष्ट्रवादीच्या संघटनेत विविध पदांवर काम करत आहेत.
चाकणकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीसोबतच प्रत्यक्ष राजकीय कारकिर्दीची सुरूवात केली, त्या अगोदर त्यांच्या सासुबाई रुक्मिणी नानी चाकणकर या नगरसेविका असताना त्यांच्या सोबत बचत गटातील महिलांसाठी उद्योग व्यवसाय व प्रशिक्षण शिबीराचे आयोजन अश्या सामाजिक कामात त्या सक्रीय होत्या. याच काळात त्यांना पुणे महानगरपालिकेचा २००५ चा उत्कृष्ट बचत गट व प्रभागातील सर्वाधिक बचत गटाचा म्हणून पुरस्कार देखील मिळाला होता.
विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती होऊ शकते?
पुढे पक्षाने त्यांच्यावर खडकवासला विधानसभा मतदार संघ अध्यक्षाची जबाबदारी दिली आणि नंतर त्यांनी पुणे शहराध्यक्षा म्हणून पाच वर्षे काम पाहिले. या कालावधीत पुणे शहरात त्यांनी पक्षासाठी महिलांची संघटना उभी केली. या काळात राज्यात पक्ष विरोधात असताना त्या वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून सक्रीय असल्याच्या दिसल्या.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रा , हल्लाबोल आंदोलन, लोकसभा आणि विधानसभा निवडणुक प्रचारातही त्यांनी सक्रीय सहभाग घेतला होता. याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा पदाची जबाबदारीही दिली आहे.
विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुणे जिल्ह्यात दमदार कामिगिरी करत ग्रामीण भागातील जागा खेचून आणल्या आहेत परंतु शहरी भागात त्या तुलनेत कमी यश मिळाले . त्यामुळे विधान परिषदेत पुण्याला झुकतं माप मिळण्याची शक्यता आहे. आता चाकणकर यांना बढती देऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस शहरी भागातील व्यक्तीला विधान परिषदेची संधी देते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

