🕒 1 min read
मुंबई : राज्यसभेच्या जागांसाठी शिवसेनेकडून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय असणाऱ्या प्रियंका चतुर्वेदी यांचे नाव निश्चित झाले. मात्र या निवडीवर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. मी एक कडवट शिवसैनिक आहे. जनतेची सेवा करत आलो आहे. यापुढेही करेन असेही चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.
यावेळी बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले, ‘ प्रियंका चतुर्वेदी यांचे काम दिसले मात्र आमचे काम दिसले नाही. मात्र स्मशानात जाईपर्यंत मी शिवसेनेत असणार आहे. मी बाळासाहेब ठाकरेंसोबत काम केलं. आता उद्धव ठाकरेंसोबत काम करतो आहे. त्यांना वाटतं की नवीन लोकांना संधी दिली पाहिजे.प्रियंका चतुर्वेदी चांगलं काम करत आहेत. हिंदी बोलतात, इंग्रजीही बोलतात. मी २० वर्षे लोकसभा गाजवली. मला आवश्यकता नव्हती पण माझ्या शहराला खासदारकीची आवश्यकता होती. मला अनेक ऑफर होत्या पण इकडे-तिकडे गेलो नाही.” असंही चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.
ते पुढे म्हणाले, ‘आदित्य ठाकरेंना प्रियंका चतुर्वेदी यांचे काम आवडले असेल. त्यामुळे त्यांनी उमेदवारी दिली असेल आम्ही देखील मराठवाड्यासाठी खूप काम केलं. पण आमचे काम त्यांना दिसत नाही. प्रियंका चतुर्वेदी नक्कीच चांगलं काम करतील. तुमची नाराजी तुम्ही पक्षप्रमुखांना सांगणार का? असं विचारलं असता ते म्हणाले, ” मी स्वतःहून त्यांच्याकडे जाणार नाही. मात्र त्यांनी बोलावले तर नक्की जाणार.”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
