मुंबई : मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेतली. मराठवाड्यातील ८० टक्के पंचनामे पूर्ण झाले असून पाऊस ओसरला की १०० टक्के पंचनामे पूर्ण होतील. हे पंचनामे पूर्ण झाल्यावर नुकसानाच्या अधारावर काही जिल्ह्यात की संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करायचा हे ठरवले जाणार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
यावेळी वडेट्टीवार म्हणाले, मराठवाड्यातील ८० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. पाऊस ओसरला की १०० टक्के पंचनामे पूर्ण होतील. राज्य सरकारकडून एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत होईल. जिल्ह्यांमधील नुकसानीची माहिती गोळा झाल्यावर दुष्काळाबाबत निर्णय घेण्यात येईल. मराठवाड्यात १७ लाख हेक्टरचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यापेक्षाही अधिक नुकसान झालेले असेल.
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात ४३६ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. ४३६ पैकी ६ मृतदेह अद्यापही मिळाले नाही. १३६ जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये १९६ जणांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. पावसामुळे राज्यात प्रचंड नुकसान झाले आहे. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. जनावरे वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. मराठवाड्यातील १० जिल्ह्यांपैकी ७ जिल्ह्यांत १८० टक्के पाऊस पडल्याची नोंद आहे. अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत दिली.
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या वाढण्याची भीती आहे. मराठवाड्यातील कापूस, सोयाबीन सह खरीपाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना कर्ज देण्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. ऑक्टोबर पासून प्रशासन प्रत्येक गावात जाऊन समस्यांचा निपटारा करण्यासाठी ग्रामसभा घेतील. एकाच ठिकाणी सर्व अधिकारी बसून समस्या सोडवतील असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्याला ५० हजार रुपयांची मदत ताबडतोब जाहीर करा; राज ठाकरे यांची मागणी
- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग देश सोडून फरार झाले ?
- सहा महिन्यानंतर प्रत्येक सरकारी खात्यात ईलेक्ट्रिक वाहने असतील- आदित्य ठाकरे
- काँग्रेसमध्ये धुसफूस सुरूच : कार्यकारी समितीची (सीडब्ल्यूसी) बैठक ताबडतोब बोलावण्याची गुलाम नबी आझाद यांची मागणी
- आपल्या पक्षाला राष्ट्रीय अध्यक्षच नाही, त्यामुळे निर्णय कोण घेतंय याची कल्पना नाही – सिब्बल


