उस्मानाबाद : जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज रविवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यावेळी वीज अंगावर पडून एक महिला शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. तसेच वादळामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील खेड येथील सुरेखा ज्ञानोबा गरड (वय ४९) या शेतात कांदे काढत होत्या. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास वादळी वारा सुरू झाला. त्याचवेळी पावसाने हजेरी लावली. पाऊस आल्याने त्या वडाच्या झाडाखाली बसल्या होत्या. त्याच दरम्यान सुरेखा यांच्या अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेली अन्य एक महिला जखमी झाली आहे.
जिल्ह्यात दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. शनिवारी सायंकाळी कळंब तालुक्यातील गोविंदपूर, देवधानोरा, मंगरुळ, शेळके-धानोरा आदी भागांत जोरदार हजेरी लावली. वाऱ्यामुळे अनेक ठिकाणच्या आंबा बागेचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात केशर आंब्याचे क्षेत्र मोठे आहे. वादळी वाऱ्याने अनेक शेतकऱ्यांच्या केशर आंब्याचे नुकसान झाले आहे. आंब्याच्या झाडाखाली कैऱ्यांचा खच साचल्याचे दिसून येत होते.
आज भूम तालुक्यातील ईट परिसरातही वीजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला आहे. यावेळी वादळी वाराही मोठ्या प्रमाणात आहे. याशिवाय पाथरुड परिसर, तुरोरी, अचलेर, उस्मानाबाद तालुक्यातील आळणी, खामगाव, रुई येथेही वादळी वारा तसेच विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.
महत्वाच्या बातम्या
- पवारांनी एका दिवसात बारामतीतच रेमडेसीवीरचे ४८० इंजेक्शन्स मोफत कशी दिली ? : भाजप
- पुण्यात रेमडेसीवीरचा तुटवडा; पुण्याच्या महापौरांनी जाहीर केले ‘हे’ मदत क्रमांक
- तुटवडा भासत असलेल्या रेमडेसिवीरबाबत मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय
- रविंद्र जडेजाच्या चुकीमुळे सुरेश रैना आऊट ; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
- पॉझिटिव्ह रुग्ण बाहेर फिरताना आढळून आल्यास कडक कारवाई केली जाईल – जयंत पाटील


