टीम महाराष्ट्र देशा : ‘देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील अनेक घोटाळे झाले असून आम्ही पुराव्यानिशी बाहेर काढणार असल्याचा इशारा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारमध्ये बांधकाम कामगार मंडळात मोठा घोटाळा झाला आहे असा आरोप शेट्टी यांनी केला .
भाजप सत्तेत नको म्हणूनच आमचा महाविकास आघाडीला पाठिंबा आहे. आमचा एकच आमदार असल्याने सरकारवर काहीही फरक पडत नाही. परंतु शेतकऱ्यांवर अन्याय झाल्यास, आम्ही महाविकास आघाडीच्या सरकारविरोधातही रस्त्यावर उतरुन संघर्ष करू, असंही राजू शेट्टी म्हणाले.
तसेच मंत्री जयंत पाटील यांनी कर्जमाफीबाबत चुकीचा आकडा मांडला. त्यांनी याद्या जाहीर कराव्या. ३१००० कोटींची बेरीज करुन दाखवावी. पूर्वीच्या सरकारनं जास्त लबाडी केली होती, या सरकारनं कर्जमाफीत जरा कमी लबाडी केली, पण लबाडी केलीय, असा आरोपही राजू शेट्टी यांनी केला.
स्वाभिमानी शेतकरी संघटना २०१४ मध्ये भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक होते परंतु नंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेट्टी आणि भाजापमध्ये बेबनाव झाला आणि दोन्ही पक्ष वेगळे झाले .


