मुंबई : भाजप नेत्या तथा तत्कालीन महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या काळातील कथित चिक्की वाटप घोटाळा प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. एकात्मिक बाल योजनेअंतर्गत मुलांना निकृष्ट दर्जाच्या चिक्कीचे वाटप करणाऱ्या खासगी पुरवठादारांवर अद्याप गुन्हा का दाखल केला नाही? असा सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला आहे.
पंकजा मुंडे यांनी २०१५ मध्ये विद्यार्थ्यांना चिक्की वाटप करण्यासाठी, काही कंत्राटदारांना कंत्राट दिले होते. पण त्यासाठी नियमित निविदा प्रक्रिया न राबवता, कंत्राट देण्यात आले आणि विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाच्या चिक्कीचे वाटप करण्यात आले असा आरोप झाला होता. याबाबत जनहित याचिका न्यायालयात दाखल केली होती. यावर गुरुवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे या याचिकांवर सुनावणी झाली. या सुनावणीत कोर्टाने प्रश्न उपस्थित करुन राज्य सरकारला अजूनही पुरवठादारांवर गुन्हा दाखल का केला नाही अशी विचारणा केली आहे.
याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, निकृष्ट दर्जाची चिक्की मुलांना वाटली. त्यात वाळू असल्याचे प्रयोगशाळेत सिद्ध झाले. अशी कोट्यवधी रुपयांची २४ कंत्राटे देण्यात आली होती. २०१५ मध्येच कंत्राटांना व कंत्राटदारांचे पैसे देण्यास स्थगिती देण्यात आली. ‘सरकारी अधिसूचनेचे उल्लंघन करून ही कंत्राटे देण्यात आली होती का? नियम पाळले होते का? ही कंत्राटे बेकायदेशीर होती की कंत्राटदार अपात्र होते? हे आम्हाला सांगा. तेव्हाच आम्ही कंत्राटदाराने पुरविलेल्या वस्तू निकृष्ट होत्या की नव्हत्या, या प्रश्नाकडे वळू. अन्नात भेसळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला का?, असे म्हणत न्यायालयाने सुनावणी तहकूब केली.
काय आहे चिक्की प्रकरण?
तत्कालीन महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी नियम डावलून एकाच दिवशी २४ कोटींची कंत्राटे देणे, ई-निविदा प्रक्रिया न राबवणे, गरजेपेक्षा अधिक वस्तू खरेदी करणे आदी आरोप पंकजा मुंडेंवर होते. हा सगळा घोटाळा २०६ कोटी रुपयांचा असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. पण डिसेंबर २०१६ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंकजा मुंडे यांना क्लिनचिट देत या प्रकरणाची फाईल बंद केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पुरुषोत्तम खेडेकरांनी मनाला वाटेल ते लिहिल्यामुळे मराठ्यांची डोकी भडकली!’
- ‘शरद पवारांनी राष्ट्रवादी स्थापन केल्यानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला’, राज ठाकरेंचा गंभीर आरोप
- शाळांच्या १५ टक्के शुल्क कपातीचा जीआर जारी, जाणून घ्या सविस्तर
- ‘मेळघाटातील ४९ नवजात शिशुंच्या मृत्युला यशोमती ठाकूर जबाबदार’, खा.नवनीत राणा स्मृती इराणींच्या भेटीला
- नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाबाबत खा. प्रीतम मुंडेंनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट


