🕒 1 min read
मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक हे गेले काही महिने ईडीच्या हातावर तुरी देऊन गायब आहेत. ईडीने पुन्हा एकदा धाडसत्र सुरु केले असून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होत आहे. अशातच काही दिवसांपूर्वी सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपशी पुन्हा जुळवून घेण्याची मागणी केली होती. यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे कार्यकर्ते-नेते फोडत आहे. दुसरीकडे मंत्री अनिल परब आणि माझ्यासारख्या लोकप्रतिनिधींवर ईडीची कारवाई केली जात आहे. यातून मानसिक त्रास देखील होत असून शिवसेनेनं भाजपशी पुन्हा जुळवून घ्यावं म्हणजे हा त्रास कमी होईल, असं भाष्य प्रताप सरनाईक यांनी केलं होतं. आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी रोखठोक भाष्य करत मोदी सरकार आणि भाजपला लक्ष्य केलं आहे.
काय म्हणतात संजय राऊत ?
‘भारतीय जनता पक्षाशी जुळवून घेतल्याने ‘ईडी’ किंवा सीबीआयसारख्या तपास यंत्रणांकडून होणारा छळ थांबेल अशी भावना लोकप्रतिनिधी, उद्योगपतींच्या मनात निर्माण झाली असेल तर हे या केंद्रीय तपास यंत्रणांचे अधःपतन आहे. ‘ईडी’ किंवा ‘सीबीआय’सारख्या संस्थांनी निःपक्ष व स्वतंत्रपणे काम करायचे असते. पण 1975 सालापासून हे सर्व बिघडले. सीबीआय हा सरकारी पोपट आहे, अशी टिपणी ज्या दिवशी आपल्या सर्वोच्च न्यायालयाने केली त्या दिवशी सर्वच संपून गेले आहे असे वाटते.
याच सीबीआय किंवा ईडीच्या त्रासातून श्री. नरेंद्र मोदी व अमित शहाही सुटलेले नाहीत. सीबीआयने अनेक प्रकरणांत अमित शहा यांच्याभोवती फास आवळला. त्यांना जामीनही मिळू दिला नाही. गुजरातमधूनही काही काळासाठी त्यांना हद्दपार व्हावे लागले होते. हा सर्व त्रास विनाकारण तसेच सूडबुद्धीचा होता. पण केंद्रात भाजपचे म्हणजे मोदींचे सरकार येताच अमित शहांचा सर्व विनाकारण त्रास थांबला. सर्व खटलेच मोडीत निघाले!
सरनाईक यांचेही तेच म्हणणे दिसते. भाजपशी जुळवून घ्या, म्हणजे आपलेही ‘विनाकारण त्रास’ थांबवता येतील. याचा सरळ अर्थ असा की, एका विशिष्ट कारणासाठी त्रास द्यायचा व वरचे बॉस सांगतील त्यानुसार योग्य वेळ येताच हा त्रास बंद करायचा हे केंद्रीय तपास यंत्रणांचे धोरण दिसते. राजकारण म्हणून ते योग्य असेलही, पण देश म्हणून घातक आहे! भाजपशी जुळवून घेतल्यावरही सरनाईकसारख्यांचा त्रास कमी होईल याची खात्री काय? केंद्रीय तपास यंत्रणांकडे अशी कोणती जडीबुटी आहे, की नोंदवलेले गुन्हे सहज पुसता येतील व सुरू केलेला तपास थांबवता येईल!’ असं भाष्य संजय राऊत यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ख्रिस गेलसह युवराज सिंग ऑस्ट्रेलियामध्ये करणार धमाल ; ‘या’ क्लबसोबत करणार करार
- ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी भारताची धावपटु हिमा दास दुखापतग्रस्त
- डब्ल्युटीसी गमावल्यानंतरही अमरनाथ यांच्याकडून विराटचे कौतुक
- ‘आठवणीतले दिवस’, फलंदाजीचा सराव करत असताना चाहरला आठवले शाळेतले दिवस!
- ‘ते’ ३ कोटी अनिल देशमुखांनी संस्थेच्या नावे वळवले; EDचा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
