🕒 1 min read
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा कोरोना मुक्तीसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने व समन्वयाने काम करीत असून संपूर्ण राज्यात मुंबई, पुणे पाठोपाठ मालेगांव हे कोरोनाच्या दृष्टीने अतिजोखीमेचे ठिकाण आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव हे राज्य शासनाच्या दृष्टीने कोरोनामुक्तीसाठी सर्वोच्च केंद्रस्थानी असून मालेगावसाठी कुठलीही तडजोड करू नये, अशा सुचना आज संयुक्तपणे पालकमंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे, कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या आहेत.
काल जिल्हाधिकारी कार्यालयात नाशिक जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कायदा, सुव्यवस्था, सार्वजनिक आरोग्य व प्रशासकीय उपाययोजना यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना संयुक्तपणे मार्गदर्शन करतांना पालकमंत्री भुजबळ, गृहमंत्री देशमुख, आरोग्यमंत्री टोपे व कृषीमंत्री भुसे बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. आरती सिंह, उपसंचालक आरोग्य डॉ. पठाणशेट्टी, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश जगदाळे व विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले ,कोरोनाच्याबाबतीत नाशिक जिल्हा अजूनही प्राथमिक अवस्थेत आहे. कोरोनाच्या निमित्ताने भविष्यात सामाजिक धार्मिक, राजकीय आणि प्रशासकीय अशा विविध प्रकारच्या समस्या समोर येणार आहेत. या सर्वांसह लोकांचे सार्वजनिक आरोग्य राखण्याचे आव्हान आपल्याला पेलावे लागणार आहे, त्यासाठी सर्वांना मोठ्या लढ्याची तयारी ठेवावी लागेल, खुप कष्ट घ्यावे लागतील, असे यावेळी बोलताना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. भुजबळ म्हणाले, मालेगावमध्ये जी परिस्थती निर्माण झाली त्याबाबतीत सुरूवातीपासूनच उपायोजना थोड्या प्रमाणत सुरू होत्या. सर्वेक्षणाला एनआरसी, एनपीआरची जोड देण्यात आल्याने याबाबतीत लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरसमजाचे वातावरण होते. स्थानिक लोकप्रतिनिधी, धर्मगुरू यांनी याप्रकरणात प्रशासनाला मोठ्या प्रमाणात सहकार्य केल्याने आज प्रशासकीय पातळीवर मालेगावमध्ये उपायोजनांना यश मिळतांना दिसत आहे.
सुरवातीच्या काळात कोरोनामुक्त असलेल्या नाशिक जिल्ह्याने मालेगावच्या रूपात कोरोनाचा उद्रेक अनुभवला. मालेगावच्या बाहेर तालुक्याच्या काही ठिकाणी कोरोनाचा संसर्ग झाल्याचे दिसून येते, याचे प्रमुख कारण मालेगाव शहरातील काही लोकांनी आसपासच्या गावांमध्ये केलेला संचार आहे. मालेगावमधून बाहेर पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होणार नाही व मालेगाव शहरातून कुणीही आसपासच्या गावांमध्ये जाणार नाही याची खरबरदारी घ्यावी.
मुंबईहून नाशिककडे येणाऱ्यांची मोठी रांग मुंबई-नाशिक रस्त्यावर दिसून येते. अनेक कुटूंबासोबत लहान मुलेही दिसून येतात. त्यांच्याशी मानवतेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने व्यवहार करावा, ज्यांच्याकडे बाहेर जाण्याची परवानगी आहे, त्यांना अडवू नका. अडचणी खुप आहेत. तरीही मतभेद होणार नाहीत याची काळजी सर्व यंत्रणांच्या प्रमुखांनी घ्यावी.गृहमंत्री अनिल देशमुख व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अत्यंत व्यस्त दिनक्रमातून व अडचणीच्या काळात नाशिक जिल्ह्यांला भेट देवून सर्व अधिकाऱ्यांचे मनोबल वाढवले, त्याबद्दल त्यांचे आभारही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी मानले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
