पैठण : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या काळात मान्यता मिळालेली वॉटर ग्रीड योजना बंद न करता ती टप्प्याटप्प्याने राबविण्याचा निर्णय मागील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. या योजनेस बुधवारी (दि.२३) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून प्रायोगिक तत्वावर या योजनेस पैठण तालुक्यापासून सुरुवात होणार असून यासाठी २८५ कोटी रुपयाच्या खर्चास मंजूरी देण्यात आली आहे अशी माहिती रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भूमरे यांनी दिली.
सुमारे दहा हजार ५८५ कोटीची ही वॉटर ग्रीड योजना असून सध्याची कोरोनाची परिस्थिती व राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता ही योजना टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात या योजनेवर २८५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या योजनेची सुरुवात पैठण तालुक्या पासून सुरुवात करण्यात येणार असून नाथ सागर जलाशयाचे पाणी पैठण तालुक्यातील घराघरात नळाद्वारे पोहोचविण्यात येणार आहे. मराठवाड्यातील ११ धरणाचे पाणी १३३० किमी लांबीच्या जलवाहिनीने सिंचन, उद्योग आणि पिण्यासाठी वापरण्यासाठी ही योजना आहे.
पहिल्या टप्प्यात तीन ठिकाणी कामे सुरू करण्यात येणार होती परंतु सध्या फक्त पैठण तालुक्यात ही योजना राबविण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या काळात या योजनेस मान्यता देण्यात आली होती. या योजनेचा डीपीआर इस्रायलच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. टप्याटप्याने ही योजना राबवित असताना डिपीआरचा फेर आढावा घेण्याची गरज असल्या बाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली होती. या योजनेसाठी लागणाऱ्या निधी बाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.
यासाठी वित्तीय संस्थाचे अर्थसहाय्य घेण्यात येणार आहे. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांची उपस्थिती होती. या योजने मुळे मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असून मराठवाडा टँकर मुक्त होणार आहे. तसेच,सिंचनाचा व उद्योगधंदे साठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. दुसऱ्या टप्प्यात औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर या ठिकाणी ही योजना राबविण्यात येणार आहे. या वॉटर ग्रीड योजनेसाठी रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांनी सतत पाठपुरावा केला आहे त्यांच्या पाठपुराव्याला शेवटी यश आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अजित पवार म्हणाले, ‘रंग आवडला नाही’; मुख्यमंत्री म्हणाले, ‘सरकारमध्ये रंग बदलण्याचं धाडस’
- रंग बदलण्याबाबतचा टोमणा मुख्यमंत्र्यांनी नेमका कुणाला मारला ?
- आंबिल ओढ्यातील कारवाईला न्यायालयाकडून स्थगिती, स्थानिकांना दिलासा
- ‘मंत्री झाले आपल्या विभागाचे राजे आणि प्रत्येक विभागात एक वाझे’; फडणवीसांचा हल्लाबोल
- ‘त्या’ लेटरबॉम्ब प्ररकणात अजित पवारांचीही सीबीआय चौकशी करा; भाजपची मागणी


